काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपल्या समर्थकांच्या गाठीभेटी सुरू करण्याबरोबरच काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केल्याने राजकीय वर्तुळात राणे यांच्या पुढील वाटचालीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. राणे यांनी मात्र अशा चर्चांबद्दल कानावर हात ठेवले आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उडालेला धुव्वा तसेच पक्षात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने राणे हे वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली. दोन-तीन दिवसांत महत्त्वाची बातमी देईन, असे राणे यांनी अलीकडेच सूचित केल्याने राणे काँग्रेसचा हात सोडणार, असा अर्थ काढला जाऊ लागला. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने राणे यांची ही मोहीम थंडावली होती. तेव्हा नाराज राणे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही त्यांची भेट घेतली होती. या पाश्र्वभूमीवर सिंधुदुर्गमधील काँग्रेसमधील राणे समर्थक महत्त्वाचे पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. या समर्थकांनी शुक्रवारी राणे यांची भेट घेऊन चर्चा केली. शिवसेना सोडण्यापूर्वी राणे यांनी अशीच वातावरणनिर्मिती केली होती. राणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असली तरी त्यांचे पुत्र नितेश यांनी त्याचा इन्कार केला.

असंतुष्ट आमदारांचा पाठिंबा ?
काँग्रेसमधील काही असंतुष्ट आमदार राणे यांच्याबरोबर आहेत, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे काँग्रेसच्या आमदारांना त्यांच्या भवितव्याची चिंता आहे. पक्षातील बहुतांशी आमदार मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत. जास्तीत जास्त आमदारांचा पाठिंबा मिळविण्याचा राणे यांचा प्रयत्न सुरू आहे. राणे पक्ष सोडणार नाहीत, पण त्यांनी दबावतंत्राचा अवलंब केल्याचे काँग्रेसमध्ये बोलले जाते. पण काँग्रेसमध्ये दबावतंत्राला फार महत्त्व दिले जात नाही याची अनेक उदाहरणे आहेत.