शिवसेनेतून हकालपट्टी झाली तेव्हा किंवा अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात केलेल्या बंडाच्या वेळी राणे एकदम आक्रमक झाले होते. या वेळी तो जोश किंवा आवेश राणे यांच्यात दिसला नाही. तसेच आपले बंड नसून, भावना व्यक्त केल्याचे सांगत आक्रमकपणाला मुरडच घातली.
शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारल्यावर राणे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना लाखोल्या वाहिल्या होत्या. २००८ मध्येही राणे यांनी राहुल गांधी, अहमद पटेल या काँग्रेस नेत्यांवर आरोप केले होते. या वेळी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर टीका केली असली तरी राणे यांनी काहासा संयम पाळला. कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका करण्याचे टाळले. इतर पक्षांमध्ये संधी असल्याचे राणे सांगत असले तरी योग्य पर्याय राणे यांच्यासमोर नसावा. म्हणूनच त्यांनी काहीशी मवाळ भूमिका घेत ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी भूमिका घेतली आहे. राजीनामा परत घेतल्यास राणे यांच्यावर टीका होऊ शकते. ते राणे यांना फारच त्रासदायक ठरेल. राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला असल्याने स्वत: मुख्यमंत्री राणे यांची समजूत काढण्याबाबत फारसे अनुकूल नाहीत.

आमदार गायब
नारायण राणे यांचे सारेच सहकारी त्यांच्याबरोबर नाहीत याची प्रचिती कोकण दौऱ्यातही आली. राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी राणे यांच्या मागे त्यांची दोन मुले आणि काही माजी आमदार वा नगरसेवक दिसत होते. पण समर्थक आमदारांपैकी कोणीच या वेळी राणे यांच्या आजूबाजूला नव्हते. काँग्रेसमध्ये राणे यांचे तीन कट्टर समर्थक आमदार मानले जातात. पण यापैकी कोणीच फिरकले नाहीत.