नरेंद्र मोदी यांची प्रचारमोहीम सांभाळलेल्या पथकावर आता महाराष्ट्र विधानसभा जिंकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विजयाचा जल्लोष थांबवून नव्या आव्हानांना सामोरे जा, असे निर्देश मोदींनी या पथकाला दिल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा हाताळली गेली त्याच प्रमाणे महाराष्ट्रात प्रश्नांचा अभ्यास करून काम सुरू करावे, असे आदेश देण्यात आल्याचे मानले जात आहे. राज्यात डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे.
पंतप्रधान व्यस्त असल्याने त्यांना व्यक्तिगतरीत्या प्रचारमोहिमेची देखभाल करणे शक्य नाही. त्यामुळे प्रचार आखणाऱ्यांनी स्थानिक पक्ष नेतृत्वामागे तातडीने ताकद उभी करावी, असे मोदींनी सांगितल्याचे एका निकटवर्तीयाने सांगितले. राज्यात कोणते स्थानिक मुद्दे प्रभावी ठरतील, तसेच यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांचा सर्व तपशील गोळा करण्यास प्रशांत किशोर यांनी सुरुवात केली आहे. मोदी यांच्या निवडणूक व्यवस्थापनात त्यांचा मोलाचा वाटा होता. मतदान करताना कोणत्या बाबींचा प्रभाव यापूर्वी पडला, याचा अभ्यास केला जात असल्याचे सिटिझन्स फॉर अकौंटेबल गव्हर्नन्स या स्वयंसेवी संस्थेत काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्याने सांगितले. ‘चाय पे चर्चा’सारखे उपक्रम मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाच्या मदतीने हाती घेतले जाणार आहेत.
महाराष्ट्रात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने ट्विटर, फेसबुक आणि यू-टय़ुब ही प्रचाराची प्रमुख माध्यमे राहणार आहेत. प्रचारासाठी मोबाइलचा प्रभावी वापर कसा करता येईल याचा विचार सुरू आहे. मोदींची प्रचारमोहीम सांभाळलेल्या पथकाखेरीज पक्षातील केंद्रीय नेत्यांचे पथकही राज्य भाजपच्या दिमतीला असेल. भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी १७ जून रोजी या पथकातील स्वयंसेवक तर १६ जूनला फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे निमंत्रक राजेश जैन यांच्याबरोबरच पक्षाच्या तंत्रज्ञान विभागाची बैठक मुंबईत बोलावली आहे.

शेतकऱ्यांना अपुरी मदत, राज्याबाहेर उद्योगांचे स्थलांतर यामध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योग पुण्याबाहेर, तर वस्त्रोद्योग मुंबईबाहेर गेल्याचा मुद्दा आहे. जमीन व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार, मोठय़ा शहरांमध्ये अपुऱ्या पायाभूत सुविधा तसेच काँग्रेसमध्ये नेतृत्वाचे संकट हे मुद्दे प्रचारात प्रमुख राहतील. याबाबत १६ तारखेच्या बैठकीत चर्चा होईल. पथकातील कार्यकर्ता