नरेंद्र दामोदरदास मोदी या व्यक्तीच्या अंगात गेले जवळपास सहा महिने निवडणूक संचारलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरण्यापासून ते पक्षांतर्गत विरोधक विजनवासात जातील याची हमी बाळगत पक्षप्रचारकार्याचा गाडा एकहाती हाकण्यापर्यंत सर्व कामे मोदीच करतात. प्रचारसभांची त्यांची तयारी ही राजकारण्यापेक्षा एखाद्या कंपनी प्रमुखाची आठवण करून देणारी. त्यांच्या निवडणूक दौऱ्यात स्थानिक नेते फारसे आसपास नसतात. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर त्यांचे राज्यातील वाटाडे दोन. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि आमदार विनोद तावडे. दहा दिवसांपूर्वी जेव्हा या प्रचार दौऱ्यात पहिल्यांदा मोदींची भेट झाली, तेव्हा त्यांना विचारलं होतं आणखी कुठे जाणार. त्यावर ते म्हणाले..ये दोनो ले जाएंगे वहाँ.  वास्तविक मोदी यांची वाटचाल ज्यांनी पाहिली आहे, त्यांच्यासाठी त्यांचे हे विधान त्यांच्यातील बदल दाखवणारे. प्रस्तुत प्रतिनिधीने या आधीही गेल्या सहा सात वर्षांत किमान तीन चारदा तरी मोदी यांच्याशी मुलाखत वा अन्य निमित्ताने संवाद साधला आहे. त्यामुळे त्यांच्यातील हा बदल अधिकच जाणवणारा. याआधी अवघड प्रश्न आल्यावर कठोर करडा चेहरा करीत आपली नाराजी व्यक्त करणारे मोदी आता तशा प्रश्नांना हसतखेळत नाही, तरी कोऱ्या चेहेऱ्याने का असेना सामोरे तरी जाताना दिसतात. त्यांच्या मुलाखतीचा हा संपादित अंश.
* देशात आता १६ मे नंतर तुमचे सरकार येणे अटळ दिसते. तशा स्वरूपाची भावना अनेक जण व्यक्त करू लागले आहेत. तर अशा वेळी ‘पंतप्रधान मोदी’ या नात्याने कोणत्या पाच मुद्दय़ांना हात घालणे प्राधान्यक्रमाने तुम्हाला महत्वाचे वाटते?
– जनतेच्या इच्छेनुसार आम्हाला सरकार बनवण्याची खरोखरच संधी मिळाली, तर माझ्या दृष्टीने अत्याधिक महत्वाचा मुद्दा असेल तो जनतेचा सरकारवरून उडालेला विश्वास पुन्हा कसा प्रस्थापित होईल हा. जनतेचा सरकारवरून विश्वास उडणे हे माझ्या दृष्टीने अत्यंत धोकादायक. तो विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे हे माझे पहिले कर्तव्य असेल. ते काम हाती घेण्यात मी जराही वेळ दवडू इच्छित नाही.
दुसरा मुद्दा सरकारचा धोरण लकवा दूर करणे हा. गेल्या पाच वर्षांच्या या विकारामुळे गुंतवणुकदार, उद्योगपती आणि एकूणच अर्थविश्व अर्धमेले झालेले आहे. लवकरात लवकर निर्णय प्रक्रिया प्रस्थापित करून काही महत्वाचे निर्णय घेतल्यास त्या विश्वास पुन्हा उभारी येईल. तिसरा मुद्दा मृतवत् झालेले पायाभूत सोयीसुविधा क्षेत्र आणि कारखानदारी. आपल्याला आठवत असेल की अटल बिहारी वाजपेयी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात या दोन्ही आघाडय़ांवर मोठी घोडदौड सुरू होती. पायाभूत क्षेत्र आणि कारखानदारी यांना गती दिल्यामुळे त्यांच्या जिवावर अनेक क्षेत्रांना संजीवनी मिळत असते. माझ्या दृष्टीने हे असे घडणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे विकासाचे चक्र वेग घेऊ लागते आणि रोजगाराच्या संधी निर्माण होऊ लागतात. त्या तशा निर्माण होताना दिसल्या तरच वातावरणात सकारात्मक बदल होतो. तेव्हा हा मुद्दा माझ्या पहिल्या पाचांतील महत्वाच्या निर्णयांत असेल. या नंतर प्राधान्यक्रमात असेल ते विविध क्षेत्रांतील सुधारणांना गती देणे. माझ्या दृष्टीने केवळ आर्थिक सुधारणाच नव्हे तर प्रशासकीय, न्यायालयीन, निवडणूक आणि अगदी पोलीस सुधारणाही तितक्याच महत्वाच्या आहेत. आतापर्यंत वेगवेगळय़ा समित्यांनी काय करायला हवे ते सुचवलेले आहे. तेव्हा पुन्हा ते नक्की करण्यात मी जराही वेळ घालवणार नाही. माझे लक्ष असेल ते या सुधारणांच्या अंमलबजावणीचा कालबध्द कार्यक्रम हाती घेण्यावर. याच्या जोडीला समांतरपणे माझे प्रयत्न असतील ते राजकारणाचे गुन्हेगारीकरण संपुष्टात आणण्याचे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीने काही निश्चित उपाय योजना केल्या जातील आणि नागरिकांना त्या अनुसार काही घडताना दिसेल. आणि शेवटचा मुद्दा सर्व राज्य सरकारांना बरोबर घेऊन विकासाच्या प्रक्रियेत भागीदार करून घेणे. शिक्षण, आरोग्य, अन्नपुरवठा आदी अनेक विषयांतील बदल राज्य सरकारांना समवेत घेतले तरच करता येणार आहेत. तेव्हा राज्य आणि केंद्र यांच्यात निरोगी आणि सुदृढ संबंध तयार करणे हे प्रशासन गतीमान करण्यासाठी आणि त्या गतीचा प्रत्यय नागरिकांना यावा यासाठी नितांत गरजेचे आहे. माझे प्राधान्य या मुद्दय़ांना असेल.
* उद्योगमित्र अशी तुमची एक प्रतिमा तयार झाली आहे. तेव्हा तुमच्या दृष्टीने मनमोहन सिंग सरकारने घेतलेले कोणते निर्णय तुम्हाला उद्योगविरोधी वाटतात? त्यात तुमच्याकडून काय बदल होतील?
– माझ्या मते मनमोहन सिंग सरकारने कोणते वाईट निर्णय घेतले हा अजिबात काळजीचा विषय नाही. तर त्या सरकारने मुळात निर्णयच घेतले नाहीत हे माझ्या मते अधिक दखलपात्र आहे. हे वास्तव असल्यामुळे त्यांनी कोणते निर्णय चुकीचे घेतले आणि मी कोणते बदलेन हा विषय नाही. कोणत्याही प्रश्नावर निर्णय घ्यायचेच नाहीत हा त्या सरकारचा निर्णय होता. त्यात त्यांनी जे काही निर्णय घेतले ते वेळ टळून गेल्यावर. त्यामुळे तेही निरूपयोगी ठरले. विलंब आणि विशेषाधिकार हे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारचे व्यवच्छेदक लक्षण बनून गेले आहे. यातील विलंब एकवेळ कमी धोकादायक. पण विशेषाधिकारांमुळे मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आणि ही विशेषाधिकार संस्कृती संपवणे हे माझ्या दृष्टीने महत्वाचे. आगामी सरकार त्यासाठी बांधील असेल. आम्ही धोरणांच्या आधारे पुढे जाऊ, विशेषाधिकारांच्या आधारे नाही. प्रामाणिक, पारदर्शी आणि गतीमान प्रशासनाला उत्तेजन हे माझे प्राधान्य असेल, विशेषाधिकार नाहीत.
* तुमच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर काय परिणाम होईल?
– वसुधैव कुटुंबकम हा विचार हिंदुच आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे परस्पर आदर आणि सहकार्य हाच आमच्या परराष्ट्र धोरणाचा गाभा असेल. तेव्हा माझ्या मते माझ्या हिंदुत्ववादी चेहेऱ्याचा झाला तर परराष्ट्र धोरणावर चांगलाच परिणाम होईल, यात मला जराही शंका नाही.
* अमेरिकेचा खासकरून तुमच्यावर विशेष राग दिसतो. तुम्ही सत्तेवर आलात तर त्या देशाच्या भारताबाबतच्या दृष्टीकोनात बदल होईल का? तो होणार असेल तर काय होईल आणि होणार नसेल तर तुमचा अमेरिकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय असेल?
– या संदर्भात माझी भूमिका स्वच्छ आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या रालोआ सरकारने तयार करून दिलेल्या मार्गानेच जाणे. कोणाही देशाबरोबरच्या आपल्या संबंधांसाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने तयार करून दिलेल्या नीतीतत्वांच्या आधारेच आम्ही मार्गक्रमणा करू. हाच नियम अमेरिकेबाबतही पाळला जाईल. एक व्यक्ती वा त्या व्यक्तीबाबतची एखादी घटना यामुळे त्या त्या देशाबाबतच्या संबंधांवर परिणाम होत नाही. व्यक्तीपेक्षा देश आणि देशाचे हितसंबंध हा मुद्दा नेहमीच मोठा असतो.
* तुम्ही एकांगी, हुकुमशाही वृत्तीचे आहात, असा एक आरोप तुमच्यावर सतत होत असतो. त्यात कितपत तथ्य आहे? त्यात तुमच्या मते तथ्य नसेल तर हा आरोप वारंवार का होतो? आणि तथ्य असेल तर तसे आरोप होऊ नयेत म्हणून तुम्ही काय प्रयत्न कराल?
– गेली दहा वर्षे केंद्रात काँग्रेसचं सरकार आहे. मला एका विशिष्ट रंगात रंगवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. त्यात प्रचाराचा मोठा भाग होता आणि आहे. परंतु आता प्रसारमाध्यमे आणि एकूणच जनतेला या प्रचारामागचं सत्य कळू लागलेलं आहे. त्या मागचा काँग्रेसचा हातही आता सर्वाना दिसून आलेला आहे. वस्तुत माझी कार्यशैली सांघिक आहे आणि कोणत्याही विषयाशी संबंधितांत जास्तीत जास्त मुद्यांवर सहमती कशी होईल असाच माझा प्रयत्न असतो. तरीही अजूनही माझ्या विषयीच्या केवळ प्रचारावरच ज्यांना विश्वास ठेवायचा आहे, त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे. ते म्हणजे मी कसा आहे ते माझ्या कामातून आणि निर्णय प्रक्रियेतून पाहा आणि मग ठरवा. माझ्याविषयी अन्य काय म्हणतात या पेक्षा प्रत्यक्ष अनुभववावरच माझ्या विषयी मत बनवा. तसं झाल्यास माझ्याविषयीची अनेकांच्या मनातील प्रतिमा बदलेल. कारण माझा विश्वास आहे, सत्य हे असत्य प्रचाराला पुरून उरतं.
* सध्याच्या निवडणुकीने विविध पक्षांत एक प्रकारची शत्रुत्वाची भावना तयार झालेली आहे. सर्व पक्षांनीच जरा शांत व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं का? भडकभावनेनं झालेल्या जखमांवर फुंकर घालण्याची गरज तुम्हाला वाटते का?
– माझा आणि माझ्या पक्षाचा तरी निदान प्रयत्न आहे तो मुख्य मुद्दे, धोरणं या भोवतीच प्रचार फिरता ठेवण्याचा. लोकांना याच प्रश्नांत जास्त रस आहे. परंतु माझ्या विरोधकांबद्दल मात्र हे म्हणता येईल अशी परिस्थिती नाही. सत्तात्याग करावा लागेल या भीतीनं एक प्रकारचं नैराश्य त्यांना आलं असून त्यांनी प्रचार व्यक्तीकेंद्रीत केला आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांची भाषा तर आक्षेपार्ह म्हणावी अशी आहे. परंतु त्यातही खिन्न करणारी बाब त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्याकडे कानाडोळा करणं. यामुळे एका अर्थानं बेजबाबदार आरोप-प्रत्यारोपांना उत्तेजनच मिळतं. परंतु मला आता या शिव्याशापांची सवय झाली आहे. हेही मला जाणवतं की हे सगळं वातावरण तापतं ते निवडणुकांपुरतंच. त्या एकदा संपल्या की परिस्थिती हळुहळु का होईना पूर्वपदावर येऊ लागेल.
* सरत्या लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अगदीच अत्यल्प सहकार्य होतं. तुमचं व्यक्तिमत्व लक्षात घेता हे सहकार्य वाढावं यासाठी तुम्हाला जरा जास्तच प्रयत्न करावे लागतील असं तुम्हाला वाटतं का?
– तुमचं हे विधान अपुऱ्या माहितीवर आधारीत आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यातलं संसदीय सहकार्य संपुष्टात आलंय हेच मला मान्य नाही. सध्याच्या निवडणुकीच्या वातावरणात तुम्हाला असं वाटत असावं. या वातावरणात असं होणं साहजिकच आहे. परंतु संसदेत नक्कीच अशी परिस्थिती नव्हती. गेल्या दहा वर्षांच्या काळात प्रमुख विरोधी पक्ष या नात्यानं भाजपनं सरकारला अनेक मुद्यांवर सहकार्य केलं आहे. मग तो अन्न सुरक्षा कायद्याचा मुद्दा असो वा लोकपाल वा तेलंगण निर्मिती किंवा जमीन हस्तांतरण कायदा असो. अनेक प्रश्नांवर सरकारला आमची मदत झाली आहे. प्रौढ आणि समजंस राजकारण्यांना राष्ट्रीय प्रश्नांवर सर्वाचं सहकार्य कसं मिळवायचं ते नेहमीच कळतं.
* तुमचे काही विशिष्ट उद्योगपतींशी, विशेषत अदानी समुहाशी अतिजवळकीचे संबंध आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाकडून सातत्यानं होतोय. तुमची त्या बाबतची प्रतिक्रिया..
– बिनबुडाच्या प्रत्येक आणि प्रत्येकाच्या आरोपांना उत्तर देत बसणं मला शक्य नाही. ते मला आवश्यकही वाटत नाही. गेला जवळपास महिनाभर मी पायाला भिंगरी लावल्यासारखा देशभर फिरतोय. ती जबाबदारी मला जास्त महत्वाची वाटते. त्यामुळे माझ्या पक्षातल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी या आरोपांना उत्तर दिलंय. माझ्या मते ते पुरेसं आहे. त्या पलिकडे जाऊन असल्या आरोपांचा प्रतिवाद करणं मला अनावश्यक वाटतं. माझ्या मते सत्य परिस्थिती सर्वासमोर आलेली आहे.
*आता मुद्दा महाराष्ट्राचा. लोकसभा निवडणुकांनंतर काही महिन्यांतच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहेत. या पाश्र्वभूमीवर भाजपचा २५ वर्षांचा साथीदार असलेल्या शिवसेनेशी संबंध ताणलेले आहेत. तुमच्या मते त्या मागची कारणं काय?
– माझ्या मते भाजपचे सर्वच घटक पक्षांशी असलेले संबंध हे आदर्शवत असे आहेत. आघाडीचा धर्म पाळणारा भाजपसारखा दुसरा पक्ष नसेल. काँग्रेस प्रमाणे आम्ही आमच्या सहकारी पक्षाचा कधीच अपमान करीत नाही. आमच्या सर्वच साथीदारांशी आमचे संबंध अत्यंत उत्तम आहेत. यात शिवसेनाही आली. भविष्यातही हे संबंध असेच असतील.
महाराष्ट्रात तुम्हाला आणखी एका साथीदाराची आवश्यकता आहे, असं वाटतं का? या प्रश्नास अर्थातच तुमच्या आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांची पाश्र्वभूमी आहे..
– मी आताच म्हटल्याप्रमाणे आमचे आमच्या सर्व घटक पक्षांशी उत्तम संबंध आहेत आणि ते भविष्यातही तसेच राहतील. किंबहुना राष्ट्रीय लोकशाही आघाडीची महाराष्ट्रातील कामगिरी ही सर्वोत्तम असेल. महाराष्ट्रातील जनता ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट राजवटीला अत्यंत कंटाळलेली आहे. त्यामुळे वातावरणात बदलाचे वारे आहेत. जनता भाजप आणि रालोआच्याच मागे ठाम उभी राहणार आहे.