यंदाची निवडणूक जिंकून बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली अर्पण करूया असे भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावरील महायुतीच्या प्रचारसभेत म्हटले. तसेच काँग्रेसवर चौफेर टीका केली
मोदी म्हणाले, “जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा आम्हाला कोणतीच चिंता नव्हती. यावेळीही ते नसले तरी यंदाची निवडणूक जिंकून बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि आजही आपण मजबूत असल्याचे दाखवून देऊया. यावेळीच्या निवडणूकीत काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव निश्चित आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यात खातेचं उघडू देऊ नका” असे आवाहनही मोदींनी केले.
राहुल गांधींवर शरसंधान करताना मोदी म्हणाले की, राहुल गांधींसाठी गरिबी म्हणजे पर्यटनाचा विषय आहे. गरिबांच्या घरी जातात आणि त्यांना जवळ घेऊन फोटो काढत बसतात मात्र, गरिबांसाठी काहीच करत नाहीत. केंद्र सरकारने किती जणांना रोजगार दिला असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने केवळ गरिबांच्या डोळ्यात धुळफेक केल्याचे मोदींनी म्हटले.
तसेच देशातील चार महत्वाची शहरे केंद्रस्थानी घेऊन रेल्वेची चार विद्यापीठे तयार करता येतील आणि या विद्यापीठांमध्ये युवकांना रेल्वेबाबतीत प्रशिक्षण देता येईल असे मतही मोदींनी यावेळी मांडले. मुंबई भारतीय रेल्वेचा आधारस्तंभ असूनही मुंबईकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.