‘शेतकऱ्यांवर संकट आले की, केंद्र व राज्य सरकार दरवेळी आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करते, मात्र ते कधी तुमच्यापर्यंत पोहोचलेले दिसत नाही. त्यामुळे आता या सरकारलाच ‘पॅक’ करून पाठवण्याची वेळ आली आहे’, अशा शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या धोरणावर टीका केली. गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मोदी यांचे गुरुवारी येथे आगमन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे मतदान विदर्भातच होणार आहे. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी मोदी यांचे येथे आगमन झाले. त्यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी केंद्र सरकारच्या कृषिविषयक धोरणांवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे राजकारण करायचे नाही, असे स्पष्ट करून त्यांनी आत्महत्या न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागू नये असेच कृषीधोरण असावे. भाजप सत्तेत आल्यास आम्ही त्यालाच प्राधान्य देऊन शेतकऱ्यांसाठी कर्जपुरवठय़ाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. अटलबिहारी वाजपेयींचे सरकार असताना कृषिविमा योजना सुरू केली होती व त्याचा लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला, याची आठवणही मोदींनी यावेळी करून दिली.
मोदींचे मराठी
व्यासपीठावर उपस्थितांची नावे मोदींनी मराठीतून उच्चारली. तसेच गारपीटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आल्याचेही मराठीतून सांगितले. प्रारंभी अहेरीचे राजे अंबरिष यांनी व्यासपीठावर येऊन मोदींना पाठिंबा जाहीर केला. विदर्भातील महायुतीच्या सर्व उमेदवारांचे मोदींनी स्वागत केले.
सरकारच्या कृषीधोरणावर टीका
शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थ पुरवठय़ाची गरज आहे. फोर्म ते फ ॉरेन अशी कृ षीमालाची व्यवस्था हवी. गावातच शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग हवे. शेतीमालासाठी मालवाहू गाडय़ांची स्वतंत्र्य व्यवस्था हवी. तरच शेतकऱ्याला आर्थिक स्थर्य मिळेल असे मोदी यावेळी म्हणाले. सूक्ष्म सिंचन व्यवस्थेमुळे गुजरातच्या लाखो शेतकऱ्यांचा फोयदा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशभर तशी व्यवस्था स्वीकारली जावी असा आग्रह त्यांनी यावेळी केला. शेतीत तंत्रज्ञान हवे. पाणी वाचविण्याची चळवळ उभी करावी, असे सांगणाऱ्या मोदी यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक नवा मंत्र दिला. शेतीचा एक तृतीयांश हिस्सा पारंपरिक शेतीसाठी, एक तृतीयांश पशूपालनासाठी व उर्वरित हिस्सा बांधावरील शेतीसाठी ठेवावा अशी त्रिसूत्री त्यांनी मांडली.