केंद्रात सत्ता आल्यास ममता बॅनर्जी सरकारचे सहकार्य मिळवून पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकीकरणाला अनुकूल असे वातावरण निर्माण करू, तसेच सिंगुर प्रकल्पाबाबतचा तिढाही सोडवण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
सिंगुरचा तिढा सोडवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, अशी आशा आहे. पश्चिम बंगालमध्ये उद्योगांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यासही राज्य सरकारचा पाठिंबा मिळेल. राज्यात विकासाच्या मुद्दय़ावर तृणमूल काँग्रेस मताचे राजकारण करणार नाही, असा विश्वासही मोदी यांनी येथील एका दैनिकाशी बोलताना व्यक्त केला.
नॅनो प्रकल्पाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, जेव्हा टाटाचा प्रकल्प अडचणीत आला होता. तेव्हा गुजरात सरकारने टाटांना जमीन दिली. मात्र असे पाऊल उचलून पश्चिम बंगालला दुखवायचा आमचा हेतू नव्हता. पण तरीही माझ्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाल्याचेही ते म्हणाले.
आता मी जेव्हा गुजरातमधून बाहेर पडून संपूर्ण देशाच्या विकासाचा विचार करतो, तेव्हा सिंगुरचाही विचार तेवढय़ाच तळमळीने करतो, असे मोदी म्हणाले.
ममता बॅनर्जी माझ्याबद्दल काहीही बोलल्या, तरी मी त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. दोन्ही पक्षांमध्ये राजकीय मतभेद असले तरी विकासाच्या मुद्दय़ावर पश्चिम बंगालला कधीही सापत्न वागणूक दिली जाणार नाही, असे आश्वासन मी देतो, असे मोदी म्हणाले.