वाराणसीमध्ये सभेसाठी परवानगी नाकारल्याने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाविरोधात टीका केल्याने काँग्रेस आणि संयुक्त जनता दल (जेडीयू) या पक्षांनी मोदींवर जोरदार शरसंधान सोडले. मोदी यांची निवडणूक आयोगाविरोधातील भूमिका अवमानकारण आणि अन्यायकारक आहे. मोदी यांची ही टीका त्यांच्या पराकोटीच्या नैराश्याचे सूचक आहे, असा टोला या पक्षांनी लगावला.
पंतप्रधानपदाचा उमेदवार जर निवडणूक आयोगावर टीका करत असेल, तर तो स्वत:ला आयोगापेक्षाही मोठा समजायला लागला आहे, असाच त्याचा अर्थ होतो, असेही चिदम्बरम म्हणाले. एकेकाळचा भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या जेडीयूनेही भाजपवर टीका केली. निवडणुकीच्या फायद्यासाठी अशा प्रकारची ‘धरणे’ धरणे अयोग्य आणि अन्यायकारक आहे,’’ अशी टीका जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी केली.मोदींचा हा कार्यक्रम धार्मिक नसून पूर्णत: राजकीय आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली.

‘मते मिळवण्यासाठी भाजप, सपाची वाराणसीत नाटके’
लखनऊ : मतांचा फायदा मिळवण्यासाठी आणि मतदारांना भुलवण्यासाठी भाजप आणि समाजवादी पक्षाने वाराणसीत नवी नाटके सुरू केली आहेत, अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी गुरुवारी केली. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना वाराणसीमध्ये सभेसाठी परवानगी नाकारल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. भाजपची ही नाटके असून समाजवादी पक्षाचीही त्याला साथ आहे, अशी टीका मायावती यांनी केली.

एक सभा रद्द झाली तर लगेचच त्यांना चीड का आली?भाजप नैराश्याच्या गर्तेत अडकला आहे, म्हणूनच त्यांनी अशा प्रकारचा अवमानकारक हल्ला निवडणूक आयोगावर लगावला.
-पी. चिदम्बरम , काँग्रेस नेते