लोकसभेत १६ खासदार निवडून आलेल्या तेलुगू देसमला हवाई वाहतूक हे महत्त्वाचे आणि चांगले खाते सोपविण्यात आले असतानाच, १८ खासदार निवडून आलेल्या शिवसेनेची अवजड उद्योग हे तुलनेत कमी महत्त्वाचे खाते सोपवून बोळवण करण्यात आली आहे.
मोदी यांच्या मनात शिवसेनेबद्दल असलेली अढी लपून राहिलेली नाही. गेल्या डिसेंबर महिन्यात मुंबईत झालेल्या जाहीर सभेत त्यांनी शिवसेनेचे नावही घेण्याचे टाळले होते. मोदी यांना लक्ष्य करण्याची एकही संधी शिवसेनेने सोडलेली नाही. शिवसेनेच्या मुखपत्रातून अनेकदा मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर खातेवाटप करताना मोदी यांनी शिवसेनेवर सूड उगावल्याचीच चर्चा आहे.  भाजप आणि शिवसेनेत लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच धुसफूस सुरू होती. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे महत्त्व वाढू नये म्हणूनच सरकारमध्ये शिवसेनेला दुय्यम दर्जाचे खाते सोपविण्यात आल्याची चर्चा आहे.