नितीशकुमार यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेपोटीच जनता दलाने भाजपशी युती तोडली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत केला. नितीशकुमार यांचा अहंकार एव्हरेस्ट पेक्षाही जास्त असल्याची टीका करत, आपल्या इतके पंतप्रधानपदासाठी कुणी लायक नाही, असा नितीशकुमारांचा समज असल्याचा टोलाही मोदींनी लगावला.
मोदींनी प्रचारसभेत प्रामुख्याने नितीशकुमार यांनाच लक्ष्य केले. नितीशकुमारांना पंतप्रधानपदाच्या स्वप्नामुळे झोप येईना असा टोला लगावला. भाजप सरकार सत्तेत आल्यावर बिहारला विशेष पॅकेज देण्याचे आश्वासन मोदींनी दिले. २०१० मध्ये बिहार सरकारने गुजरातने पूरग्रस्तांसाठी दिलेली मदत नाकारली होती त्याचाही मोदींनी समाचार घेतला. भाजप सत्तेत आल्यास केंद्राकडून कोणतीही मदत घेणार नाही, हे आता नितीशकुमार यांनी जाहीर करावे, असे आव्हानच मोदींनी दिले. गुजरातच्या लोकांना दिलेली मदत नाकारण्यातून नितीशकुमार यांचा उद्दामपणा दिसून आला. याबाबत नितीशकुमारांनी माफी मागावी, अशी मागणी मोदींनी केली. राज्यात गुन्हेगारी वाढत आहे तरीही बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असल्याचा दावा सरकार कशाच्या आधारे करते, असा सवाल मोदींनी केला. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सर्वच जण मुस्लिमांची फसवणूक करत असून, गुजरातमध्ये मुस्लिमांची स्थिती चांगली असल्याचा दावा मोदींनी केला. काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल आघाडीवरही मोदींनी टीका केली.