लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने हळदीकुंकू समारंभांपासून शिर्डीच्या पालख्या, सत्यनारायण पूजा, भंडाऱ्याच्या भोजनावळी आणि रक्तदान शिबीरांपर्यंत सर्वत्र इच्छुक उमेदवारांनी आपली हजेरी लावण्यास आणि भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. ईशान्य मुंबईत भाजपच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट नसल्याने किरीट सोमय्यांनी जनसंपर्काचा धडाका लावला आहे, तर पूनम महाजन यांनी संक्रांतीचे निमित्त साधून नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेली तिळगूळाची शेकडो पाकिटे आणि भाजपचे चिन्ह असलेल्या हळदीकुंकवांच्या डब्या घरोघरी पाठविल्या आहेत. वेगळ्या प्रकारे ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी त्यांनी काही महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबीरे आयोजित केली आणि विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पेही दिली. अशा उपक्रमांमुळे मतदारसंघात आता चर्चा सुरू झाल्या आहेत. निवडणुकीचे दिवस जवळ येतील, तसे त्यात आणखी रंग तर भरले जाणारच..
निवडणूक काळात आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोण काय कल्पना राबवेल, हे सांगता येत नाही. मेघना पटेल या मॉडेलने विवस्त्र होत मोदींचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. तर आणखी एक मॉडेल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी पुढे आली. यातून मोदी किंवा राहुल गांधी यांचा प्रचार झाला नाही तरी या मॉडेलकडे लोकांचे लक्ष वेधले गेले.. असे काही सुरू झाले म्हणजे चर्चा तर होणारच!..