नरेंद्र मोदी खालच्या पातळीवरील राजकारण करत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी मोदींनी जातीचा आधार घेत, मागासवर्गीय समाजात जन्म घेणे गुन्हा आहे काय, असा सवाल केला. तसेच आपण चहा विकला, देश तर विकला नाही, असे सांगत उत्तर दिले.
येथील भाजप उमेदवार जगदंबिका पाल यांच्या प्रचारसभेत मोदींनी जातीचा आधार घेत काँग्रेसवर टीका केली. मोदींचा तुम्ही कितीही अपमान करा, मात्र मागासवर्गीय समाजाचा अवमान करू नका, असे आवाहन केले. मोदींच्या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मोदींनी सोमवारी अमेठीतील सभेत राजीव गांधी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री डी. अंजैया यांचा विमानतळावर अपमान केल्याचा आरोप केला होता. त्यावरून वाद सुरू झाला. मागासवर्गीय समाजात जन्माला येऊनही आपण कोणाचा अवमान केला आहे काय, असा सवाल मोदींनी करत, असे आरोप आपल्यावर कसा केला जातो? याप्रकरणी निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.  मोदींनी आपल्या वडिलांचा अपमान केल्याचा आरोप प्रियंका यांनी करत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार खालच्या थराचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. मी मागास समाजात जन्मलो असलो तरी आपले राजकारण खालच्या थराचे नाही, असे मोदींनी सांगितले. एकसंध भारताचे स्वप्न माझे स्वप्न आहे असे त्यांनी सांगितले.

‘मोदींनी चुकीचा अर्थ लावला’
मोदी प्रियंका यांच्या टीकेचा जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ लावत असल्याचे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले. भाजप खालच्या थराचे राजकारण करत आहे, असा आरोप प्रियंका यांनी केला होता. मागास जातीशी त्याचा संबंध नाही. मात्र मते मिळवण्यासाठी मोदींनी त्याला जातीचा रंग दिला, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते राशीद अल्वी यांनी केला. जातीच्या आधारावर आम्ही भेदभाव करत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून माफीची मागणी
प्रियंका यांच्या टीकेबद्दल काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते अरुण जेटली यांनी केली आहे. काँग्रेसच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी जातीचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे. प्रियंका गांधी यांनी ज्या पद्धतीने खालच्या दर्जाचे राजकारण हा शब्द वापरला तो टाळायला हवा होता, अशी अपेक्षा जेटली यांनी व्यक्त केली.