नरेंद्र मोदी वि. मधुसूधन मिस्त्री, बडोदा, गुजरात
बडोदा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. १९९८ पासून या मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळालेला नाही. २००९ मध्ये भाजपच्या बाळकृष्ण शुक्ला यांनी तब्बल १ लाख ३६ हजार मतांनी विजय मिळवला. या मतदार संघात येणारे सातही आमदार व महापालिका भाजपकडे आहे. गायकवाड संस्थानामुळे मराठी मतदारांची संख्याही मोठी आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा मणिनगर विधानसभा मतदारसंघ अहमदाबाद लोकसभेत येतो. मात्र तरीही मोदींनी बडोद्याला प्राध्यान्य दिले.सुरुवातीला काँग्रेसकडून पक्षांतर्गत निवडणुकीत शहराध्यक्ष नरेंद्र रावत विजयी झाले. महाराजा सयाजीराव विद्यापीठात सिनेट सदस्य असलेले रावत मोदींपुढे अगदीच नवखे असल्याने काँग्रेसने किमान लढत तरी देता यावी यासाठी अनुभवी मधुसूधन मिस्त्रींना रिंगणात उतरवले. कामगार नेते म्हणून उदयास आलेल्या मधुसूधन मिस्त्री यांची ओळख आदिवासी भागात काम करणार कार्यकर्ता अशी आहे. परदेशात शिकून आल्यानंतर १९८५ मध्ये मायदेशात परतल्यावर त्यांनी गुजरातमध्ये उपेक्षित वर्गात काम सुरू केले. बडोद्यातील राजकीय स्थिती पाहता मोदींना फारसे आव्हान असणार नाही. त्यामुळेच मोदींनी या सुरक्षित मतदारसंघाची निवड केली.