भाजपचे पंतप्रधानपदाचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा स्पष्टपणे अंदाज येणारा लोकसभा मतदारसंघ म्हणून धुळ्याचा उल्लेख करावा लागेल. ही लाट भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यासाठी वरकरणी फायदेशीर दिसत असली तरी तीच त्यांच्यासाठी अडचणही बनू पाहत आहे. या लाटेमुळे दोन समाजात ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून त्यामुळेच या मतदारसंघातील विजयाचे समीकरण काँग्रेसचे उमेदवार आमदार अमरीश पटेल यांच्यासाठीही किचकट बनले आहे.
या लोकसभा मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा हे तीन तर, नाशिकमधील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य़ आणि बागलाण हे तीन मतदारसंघ आहेत. आपचे उमेदवार निहाल अहमद अन्सारी, महायुतीचे डॉ. भामरे आणि आघाडीचे अमरीश पटेल यांच्यात खरी लढत होत आहे. सहापैकी तब्बल चार विधानसभा मतदारसंघात ताकद असलेल्या महायुतीला ‘अॅडव्हान्टेज’ असले तरी पटेल यांची कार्यपद्धती आणि बलस्थानांवर विशेष भर देण्याचे धोरण यामुळे त्यांच्यासमोर आव्हान आहे.
महायुतीत प्रारंभी उमेदवारीवरूनच घोळ निर्माण झाला. उमेदवारीच्या स्पर्धेत कुठेही नाव नसताना डॉ. भामरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकत भाजपने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडून दिली. डॉ. भामरे हे शिवसैनिक असल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता डॉ. भामरे यांनी भाजपची उमेदवारी घेतलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करत स्थानिकांसह शिवसेनेच्या नेतृत्वानेही तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या डॉ. भामरे यांनी मोदी आणि आपली समाजसेवी व निष्कलंक प्रतिमा या मुद्यांसह मराठा कार्डाचा प्रभावशील वापर करण्यावर विशेष भर दिला आहे.
मागील महिन्यात राहुल गांधी यांचा झालेला दौरा आ. अमरीश पटेल यांच्यासाठी पक्षांतर्गत विरोध शमविण्याकरिता चांगलाच उपयोगी पडला. ग्रामीण भागात स्पष्टपणे मोदी लाटेचा अनुभव येत असल्याने अल्पसंख्याकांच्या एकगट्ठा मतांवर डोळा ठेवत पटेल यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे ज्येष्ठ नेते निहाल अहमद यांचा सशर्त पाठिंबा मिळविला. काँग्रेसमधील अनेक गट-तट यामुळे पटेल यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. शिरपूरमध्ये झालेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी मालेगाव आणि बागलाणच्या ग्रामीण भागातून मोफत गाडय़ा जाऊ लागल्या. त्यातच माजी खासदार सत्यजितराजे गायकवाड यांनी बंडाची तलवार म्यान केल्याने पटेल आणि डॉ. भामरे दोघांना दिलासा मिळाला.
भाजपने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले जनराज्य आघाडीचे नेते अव्दय हिरे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत केवळ मोदी यांच्यासाठी डॉ. भामरे यांचा प्रचार सुरू केला असून ‘मोदी इफेक्ट’मुळे मालेगाव बाह्य़ मतदारसंघातील कट्टर राजकीय शत्रू हिरे आणि शिवसेनेचे आ. दादा भुसे एकाच व्यासपीठावर येण्याचा चमत्कार झाला. सध्या तरी मोदी लाटेच्या प्रभावामुळे होणारे मतांचे ध्रुवीकरण डॉ. भामरे आणि पटेल दोघांसाठी तारकही आणि मारकही ठरत आहे.

आजवर तब्बल दहा हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मतदारांनी संधी दिल्यास शिरपूरच्या धर्तीवर धुळे लोकसभा मतदारसंघात विकास घडविणार. येथे उद्योग व्यवसाय उभारण्याचा निश्चय असून बंद उद्योग सुरू करण्यास प्राधान्य देणार आहे.
    – आ. अमरीश पटेल (आघाडी)

मतदारसंघातील मालेगाव, सायने, झोडगे, अवधान या ठिकाणी मंजूर झालेल्या औद्योगिक वसाहती विकसित करण्यासाठी विशेषत्वाने प्राधान्य देणार. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. उद्योगधंद्यांसाठी पायाभूत सोयी उपलब्ध करू.
    – डॉ. सुभाष भामरे (महायुती)