भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावाची देशात लाट असल्याचा दावा पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सपशेल फेटाळून लावला आहे. काही बडय़ा उद्योगसमूहांनी तसे चित्र रंगविले असून त्यानुसार प्रचार केला जात आहे, असेही ते म्हणाले.
काही मीडियाही मोदी यांच्या नावाची लाट असल्याचे चित्र रंगवीत आहेत. मात्र देशात मोदी यांची लाट नाही, हा बडय़ा उद्योगसमूहांनी केलेला प्रचार आहे, असेही त्यांनी येथे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मोदी यांचा प्रचार करण्यासाठी काही बडय़ा उद्योगसमूहांनी मीडियाला निधी उपलब्ध करून दिला आहे.पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्य़ांना आपण भेटी दिल्या, मात्र मोदी यांच्या नावाची लाट आपल्याला जाणवली नाही असे त्यांनी सांगितले.