लोकसभा निवडणुकीतील भाजपचा आणि रालोआचा अभूतपुर्व विजय म्हणजे नरेंद्र मोदी.. देशाच्या सत्ताकारणावर घट्ट पकड असलेल्या प्रबळ काँग्रेसचे पानिपत म्हणजे नरेंद्र मोदी.. विकास आणि सुशासनाचा नारा घेऊन अवघ्या देशात चैतन्याची लाट निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या निरंकुश बहुमताचे एकमेव शिल्पकार म्हणजे नरेंद्र मोदी.. भ्रष्टाचार, महागाई, गुन्हेगारी, बेकारी आणि असंख्य समस्यांनी ग्रासलेल्या देशाला विकासाचे स्वप्न दाखविणारे आणि आश्वस्त दिलासा देणारे नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी.. सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात गेल्या काही महिन्यांपासून घुमणारा जयघोष म्हणजे नरेंद्र मोदी.. ‘अंधेरा हटेगा, कमल खिलेगा’ असा विश्वास पक्षात रुजविणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न साकारणारे नरेंद्र मोदीच.. भाजपप्रणीत आघाडीला देशाच्या सत्तेपर्यंत नेणारा नेता आणि देशातील जनतेला सुखी भविष्याची ग्वाही देणारा नेता म्हणजे, नरेंद्र मोदी.. सारे काही मोदी! एटले मोदीच!
राज्यातही आघाडीचा धुव्वा
राज्यातही भाजप-शिवसेना महायुतीने ४२ जागा जिंकून ऐतिहासिक पण अनपेक्षित असे यश मिळविले. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पार धुव्वा उडाला असून, काँग्रेसला अवघ्या दोनच तर राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावे लागले. राज्यातील ४८ पैकी भाजपला सर्वाधिक २३ जागा मिळाल्या. शिवसेना (१८), स्वाभिमानी शेतकरी संघटना (एक) असे महायुतीचे एकूण ४२ उमेदवार निवडून आले. छगन भुजबळ, सुनील तटकरे, संजय देवतळे आणि शिवाजीराव मोघे हे राज्यातील चारही विद्यमान मंत्री पराभूत झाले. मनसेला भोपळाही फोडता आला नाही, तर आपलाही हजारांमध्येच मते मिळाली.