राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे एक दिवस समर्थन करायचे तर दुसऱ्या दिवशी टीका करायची हा कार्यक्रम सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या ही मंडळी राष्ट्रवादीवर टीका करीत असताना दुसरीकडे पवार मोदी यांचे आडून समर्थन करतात हे सारेच गोंधळात टाकणारे. भाजपमध्ये मुंडे यांचा पवार विरोध जगजाहीर असताना गडकरी यांचे पवारांशी नेहमीच सख्य असते. गडकरी यांच्या संस्थेच्या कार्यक्रमाला पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात व तेथेच राजकारणात कोणी कधीच अस्पृश्य नसते, अशी गुगली टाकतात. देशात मोदी यांची लाट असल्याची हवा भाजपने तयार केली. महाराष्ट्र तर मोदीमय झाल्याची स्वप्ने भाजप नेत्यांना पडू लागली. झाले, फक्त औपचारिकता बाकी, असे भाजप नेते बोलू लागले. पण भाजपला राष्ट्रवादीकडून उमेदवारांची आयात करावी लागली. नंदुरबारमध्ये हिना गावित, सांगलीत संजय पाटील तर भिवंडीतील कपिल पाटील ही सारीच राष्ट्रवादीची स्थानिक पातळीवरील नेतेमंडळी. नाही तरी राष्ट्रवादीपुढे सारे पर्याय खुले आहेत, अशी घोषणा १९९९ मध्ये शरद पवार यांनी केली होती आणि ती घोषणा अजूनही कायम आहे. उद्या तशीच वेळ आल्यास राष्ट्रवादी भाजपपुढे मदतीचा हात पुढे करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जाते. अर्थात, शरदराव निधर्मवादाची कास सोडण्याची शक्यता नाही. पण राजकारणात कधी काहीही होऊ शकते. भाजप आणि राष्ट्रवादीच्या या आंधळ्या कोंशिबिरीमुळे काँग्रेसच्या गोटात साहजिकच संशयाची पाल चुकचुकली आहे. नंदुरबारमध्ये आपल्या कन्येला उभे करण्याचे धाडस राष्ट्रवादीच्या नेत्यांची फूस असल्याशिवाय डॉ. विजयकुमार गावित करूच शकत नाहीत, असा ठाम दावा काँग्रेसचे नेते करतात. पवार यांचे मोदी.. मोदी.. आणि राष्ट्रवादीने भाजपला उमेदवारांची रसद पुरविल्याने उभयतांमध्ये काही तरी पडद्याआडून मेतकूट तर नाही ना, अशी चर्चा तर होणारच…