स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात विजयाची शक्यता कमी असल्याने राष्ट्रवादीने हातकणंगलेची जागा काँग्रेससाठी सोडली आहे. परिणामी आघाडीत आता काँग्रेस २७ तर राष्ट्रवादी २१ जागा लढणार आहे. रायगड आणि हिंगोली मतदारसंघांमध्ये अदलाबदल करण्यात आली आहे.
आघाडीत काँग्रेस २६ तर राष्ट्रवादी २२ असेच जागावाटप झाले पाहिजे, असा आग्रह राष्ट्रवादीने गेले वर्षभर धरला होता. तर काँग्रेसने २७-२१ जागावाटप व्हावे यावर भर दिला होता. हा गुंता अनेक दिवस सुरू असतानाच शरद पवार यांच्या दबावामुळे शेवटी काँग्रेस नेतृत्वाने २६-२२ जागावाटप मान्य केले होते. कोल्हापूर जिल्ह्य़ातील हातकणंगले मतदारसंघ काँग्रेसने घ्यावा, असा राष्ट्रवादीचा आग्रह होता. पण काँग्रेसने नकार दिला होता. आमच्या वाटय़ाची एक जागा कमी करतो पण हातकणंगले घ्या, असा पवित्रा शेवटी राष्ट्रवादीने घेतला. पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात झालेल्या चर्चेत शेवटी पवार यांनी हातकणंगलेची जागा काँग्रेसच्या गळ्यात मारली. राजू शेट्टी यांच्या विरोधात विजयाची शक्यता कमी असल्याने पवार यांनी ही ‘स्मार्ट खेळी’ केली. माजी मंत्री कलाप्पाअण्णा आवाडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाईल.
मराठवाडय़ातील हिंगोली मतदारसंघातून २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील विजयी झाल्या होत्या. गेल्या वेळी पराभूत झाल्या तरी त्यांनी पुन्हा लढण्याची तयारी केली होती. पण राहुल गांधी यांचे विश्वासू अ. भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांच्यासाठी पक्षाने आग्रह धरला होता. शेवटी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी सोडली आहे.त्यामुळे नाराज झालेल्या सूर्यकांता पाटील यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
ऊस दराच्या आंदोलनाच्या वेळी राजू शेट्टी यांच्या समाजाचा उल्लेख पवार यांनी केला होता. परिणामी शेट्टी यांच्या समाजाची एक गठ्ठा मते राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता कमी होती. यामुळेच पवार यांनी एक जागा कमी करून लिंगायत जैन समाजातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आवाडे यांना उतरविण्याची खेळी केली. हातकणंगलेची जागा काँग्रेसच्या ताब्यात गेल्याने ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची इच्छा पूर्ण झाली. कारण राष्ट्रवादीकडून पाटील यांना उमेदवारी देण्याचे घाटत होते, पण स्वत: पाटील दिल्लीत जाण्यास अजिबात इच्छुक नव्हते. रायगड मतदारसंघात काँग्रेसकडे प्रभावी उमेदवार नव्हता. यामुळेच या मतदारसंघावरील राष्ट्रवादीचा दावा काँग्रेसने मान्य केला. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना या मतदारसंघातून उभे केले जाईल. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीही लढण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र तटकरे यांनाच उमेदवारी दिली जाईल.