महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांमध्ये हमरीतुमरी सुरू झाली आहे.  ‘‘१६ मेच्या निकालानंतर राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी हा मोठा पक्ष ठरला आहे. त्याची दखल घेणे तर सोडाच,  लोकसभा निवडणुकीत आलेल्या दारुण पराभवानंतरही त्यांना अक्कल आली नाही,’’ अशा खोचक शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रा. डी. पी. त्रिपाठी यांनी काँग्रेसला सुनावले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कारभाराची प्रचीती लोकसभा निवडणुकीत आली, असा टोला त्रिपाठी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला.‘‘लोकसभेत दोन जागा जास्त मिळवूनही राष्ट्रवादीने विधानसभेसाठी जास्त जागा मागितल्या नाहीत. केवळ निम्म्या जागा मागणे हा पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा मोठेपणा आहे असे त्रिपाठी यांनी सांगितले.
उपदेशाची गरज नाही राष्ट्रवादीला प्रत्युत्तर
केंद्रात आणि राज्यात सर्वाधिक काळ आघाडीच्या सरकारांचे नेतृत्व काँग्रेसने केले आहे. यामुळे आघाडीचे सरकार कसे चालवावे याचा उपदेश आम्हाला करण्याची गरज नाही, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी डी. पी. त्रिपाठी यांच्या आरोपांवर लगावला.