मुख्यमंत्रिपद मिळवायचेच, या निर्धाराने अजित पवार हे रिंगणात उतरले असतानाच राज्याचे मुख्यमंत्रिपद शरद पवार यांनीच स्वीकारावे, असा सूर पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी लावला आहे. अजित पवार यांच्या नावाला पसंती नाही, असा संदेश त्यातून गेला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी पक्षाच्या मुख्यालयात जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा उपक्रम शुक्रवारपासून सुरू केला आहे. पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी, आपणच मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली. या मागणीवर अन्य कोणीही मतप्रदर्शन केले नाही. हा प्रश्न म्हणजे नाजूक जागेचे दुखणे असल्याने कोणीही काही भाष्य केले नाही, असे या बैठकीत उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. नागपूरच्या काही पदाधिकाऱ्यांनीही असाच सूर लावला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेकांचा आक्षेप आहे. पक्षात आतापर्यंत सारे निर्णय त्यांच्या कलाने होत असल्याने कोणीही अजितदादांच्या विरोधात अवाक्षरही काढत नव्हते. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीची सारी सूत्रे शरद पवार यांनी हाती घेतल्याने पक्षातील पदाधिकारी मन मोकळे करू लागले आहेत. १९९६ पासून राष्ट्रीय राजकारणात असलेले व गेली दहा वर्षे केंद्रात कृषी खाते भूषविलेले शरद पवार हे राज्याच्या राजकारणात परतण्याची सुतराम शक्यता नाही. पण अजित पवार यांच्याबाबत पक्षात सारे काही आलबेल नाही हा संदेश पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, अशी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तशी भावना त्यांनी बैठकीत बोलून दाखविल्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.