बीड हा गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला. तरीही गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जोर लावला. जिल्ह्य़ातील सहापैकी मुंडे यांची कन्या वगळता बाकीचे सर्व आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले. त्यातच मुंडे यांना शह देण्याचे उद्योग अजित पवार यांनी सुरू केले. पंकजला राजकीय वारस नेमल्याने पुतणे धनंजय नाराज होतेच. अजितदादांनी त्यांना राष्ट्रवादीच्या गोटात आणले. बीडमध्ये गोपीनाथरावांची डोकेदुखी वाढली पाहिजे, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. गोपीनाथरावांना बीडमध्ये पराभूत करणे सोपे नाही, पण त्यांनी मतदारसंघातच अडकावे, अशी राष्ट्रवादीची योजना आहे. पण त्यासाठी तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. राष्ट्रवादीची येथेच गोची आहे. कोणी लढावे यावरून पक्षात तूं तूं मैं मैं सुरू झाले. मुंडे यांच्या विरोधात सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) जयदत्तअण्णा क्षीरसागर यांना पुढे करण्याचा पक्षातील अनेकांचा डाव आहे. तर मागासवर्गीय विरुद्ध मराठा अशी लढत होण्यापेक्षा दोन्ही इतर मागासवर्गीयांना एकमेकांच्या विरोधात लढविण्याची योजना आहे. मुंडे यांच्या विरोधात जयदत्तअण्णा तयार नाहीत. मात्र अजितदादांनी डोळे वटारले. नाहीतरी मंत्र्यांचे लाड पुरे झाले, असे मागे एका बैठकीत त्यांनी सुनावले होतेच. जयदत्तअण्णांच्या खात्यावर अजितदादांचेच वर्चस्व आहे. कारण अजितदादांचे प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी यांच्याकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची अतिरिक्त कार्यभार गेली दोन वर्षे होताच. मागे बीडच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी अजितदादांनी जयदत्तअण्णांच्या निकटवर्तीयांचा पत्ता कापला होता. ही सारी पाश्र्वभूमी लक्षात घेता अजितदादा ऐकणार नाहीत हे जयदत्तअण्णांना पक्के ठाऊक आहे. एकीकडे मुख्यमंत्री खात्याचे कोटय़वधींचे प्रकल्प मंजूर करीत नाहीत तर दुसरीकडे अजितदादा पाठ सोडत नाहीत, अशी दुहेरी कोंडी म्हणे जयदत्तअण्णांची झाली आहे!