हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याने २७-२१ असे जागावाटप झाल्याने काँग्रेसच्या गोटात राष्ट्रवादीची कशी जिरवली अशी प्रतिक्रिया असली तरी शरद पवार यांनी टाकलेल्या गुगलीने काँग्रेसच जाळ्यात अडकला आहे.
हातकणंगलेमध्ये राष्ट्रवादीकडे तेवढा तगडा उमेदवार नव्हता. ऊस दरावरून गेली दोन-तीन वर्षे आंदोलन करून राजू शेट्टी हे राष्ट्रवादीच्या मुळावर पाय ठेवत असल्याने त्यांना पराभूत करणे हे राष्ट्रवादीचे उद्दिष्ट आहे. अशा वेळी काँग्रेसचा वापर करून घेण्याचा धूर्त निर्णय शरद पवार यांन घेतला. कारण काँग्रेसचे स्थानिक नेते आणि राजू शेट्टी यांचे पडद्यामागील संबंध जगजाहीर आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तासंपादाकरिता काँग्रेस आणि शेट्टी यांचा पक्ष एकत्र आहेत. अशा वेळी राष्ट्रवादीने कितीही ताकद लावली तरी काँग्रेसची मदत मिळण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते साशंक होते. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे राहिल्या असत्या तर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी २००९च्या धर्तीवर दोन्ही मतदारसंघात विरोधकांना मदत केली असती, अशीही भीती राष्ट्रवादीली होती.
हातकणंगले मतदारसंघ काँग्रेसच्या गळ्यात मारून पवार यांनी आता काँग्रेस आणि शेट्टी यांच्यात लढाई होईल, अशी व्यवस्था केली. परिणामी काँग्रेसची गेल्या वेळप्रमाणे शेट्टी यांना मदत होणार नाही. तसेच माजी मंत्री व ज्येष्ठ नेते कलाप्पाअण्णा आवाडे यांना रिंगणात उतरवून लिंगायत जैन समाजातील दोन नेत्यांमध्येच लढत होईल अशीही खबरदारी घेतली. आवाडे यांच्यासारखा ज्येष्ठ नेता िरगणात असल्याने शेट्टी यांना निवडणूक सोपी जाणार नाही. हातकणंगलेची जागा निवडमून येण्याची शक्यता नव्हती. याउलट काँग्रेसकडून रायगडची जागा पदरात पाडून घेण्यात पवार यशस्वी झाले. या बदल्यात िहगोलीची जागा काँग्रेसला सोडण्यात आली. हिंगोलीची जागा निवडून येण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते साशंकच होते. हिंगोलीऐवजी रायगडची जागी अधिक अनुकूल असल्याचे राष्ट्रवादीचे गणित आहे. एकूणच एक जागा कमी करून राष्ट्रवादीने पडती भूमिका घेतली असली तरी त्यामागचे राष्ट्रवादीचे गणित वेगळे आहे.