अमरावती मतदारसंघातून बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर-राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उमटलेले नाराजीचे सूर कायमच असून शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी नवनीत राणा यांचा प्रचार करण्यास स्पष्टपणे नकार दर्शवला.
राष्ट्रवादीची राणी !
नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मेळावे आयोजित करण्यात आले होते. साईप्रस्थ मंगल कार्यालयातील मेळाव्यात संजय खोडके यांनी नवनीत राणा यांची उमेदवारी आपल्याला मान्य नसल्याचे निक्षून सांगितले. पक्षनेतृत्वासोबत चर्चा झाल्यानंतरच आपण आपली भूमिका ठरवणार असून तोपर्यंत आपण प्रचार करणार नाही. आपला वैयक्तिक विरोध अजूनही कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीने हात टेकले
भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात संजय खोडके यांची नाराजी दूर होईल, अशी आशा व्यक्त केली. आता वैयक्तिक हेवेदावे दूर ठेवण्याची वेळ आली असून शरद पवार यांना पंतप्रधानपदी विराजमान होताना पाहण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. एकेक जागा पक्षासाठी फार महत्वाची असल्याचे ते म्हणाले.