लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी फारच खराब झाल्याने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना सरकारमध्ये काही बदल करण्याची शरद पवार यांची योजना आहे. यानुसार फौजिया खान यांच्यासह दोन-तीन मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल.
लोकसभा निकालाच्या पाश्र्वभूमीवर पवार यांनी पक्षाचे मंत्री आणि काही ठराविक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मंत्र्यांकडून त्यांच्या जिल्ह्यांतील पराभवाची कारणे जाणून घेतली. विधानसभा निवडणुकीसाठी काय करावे लागेल याचा अंदाज घेतानाच काही बदल करण्याचे त्यांनी सूचित केले. फारशी चांगली कामगिरी नाही किंवा निवडणुकीत तेवढा प्रभाव न पाडू शकलेल्या दोन किंवा तीन मंत्र्यांना बदलण्याची योजना असल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात आले.
परभणी मतदारसंघात काम न केल्याबद्दल पक्षाने शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांना यापूर्वीच नोटीस बजाविली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेची आमदारकी खान यांनी लागोपाठ दोनदा भूषविली. त्यांच्या आमदारकीची मुदत संपली असून त्यांना नव्याने संधी दिली जाणार नाही, असे सांगण्यात आले. याशिवाय आणखी दोघांना वगळले जाण्याची शक्यता आहे. मुलगी भाजपच्या वतीने लढल्याने डॉ. विजयकुमार गावित यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती. गावित यांच्या भावाचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.  पक्षाची कामगिरी सुधारण्याकरिता पवार नेहमीच धक्कातंत्राचा अवलंब करतात. गेल्या वर्षीही त्यांनी पाच मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. मंत्रिमंडळातील बदलांबाबत पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कल्पना दिल्याचे समजते. दोनच दिवसांपूर्वी या दोन नेत्यांमध्ये  सविस्तर चर्चा झाली होती.  
विधानसभा निवडणुकीत यशस्वी होण्याकरिता कोणते उपाय योजण्याची आवश्यकता आहे यावरही पवार यांनी भर दिला होता. पक्षाचे सध्या ३० प्रवक्ते असून, नवाब मलिक वगळता बाकीच्या सर्वांची पदे काढून घेण्यात आली. आर. आर. पाटील, जयंत पाटील, सचिन अहिर, राहुल नार्वेकर अशा काही ठराविक नेत्यांकडे ही जबाबदारी सोपविली जाईल.
मुंबईत शक्तिप्रदर्शन
पक्षाच्या १६व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या ८ किंवा ९ जूनला मुंबईत मोठी सभा आयोजित केली जाणार आहे. पक्षाचा वर्धापनदिन १० जूनला असला तरी त्यादिवशी विधिमंडळाचे अधिवेशन असल्याने त्याच्या आदल्या दिवशीच जाहीर सभा होईल, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.