लोकसभा निवडणुकांचे निकाल उद्या, शुक्रवारी जाहीर होणार असतानाच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीने संभ्रमाचे वातावरण कायम ठेवले आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी रालोआला पाठिंबा देण्याचे नाकारले असताना प्रफुल पटेल यांनी देशाला स्थिर सरकारची गरज असल्याचे सांगत राष्ट्रवादी रालोआला पाठिंबा देण्याच्या मानसिकतेत असल्याचे संकेत दिले. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच ही शक्यता फेटाळून लावत यासंदर्भातील वावडय़ांना पूर्णविराम दिला.
राष्ट्रवादी रालोआला पाठिंबा देणारा या मुद्दय़ावरून राजधानी दिल्लीत बुधवारी वावडय़ांचे मोहोळ उठले होते. मात्र, प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी त्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. यूपीएच्या स्थापनेपासून आम्ही काँग्रेससोबत आहोत. महाराष्ट्रातही आम्ही सत्तेचे वाटेकरी आहोत. असे असताना रालोआला पाठिंबा देण्याची गरजच उरत नसल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी नकोच
केंद्रात सत्तेत आल्यावर राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्यास भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांनीही नकार दिला आहे. राष्ट्रवादीला महायुतीत सामील करून घेण्यात महायुतीतील इतर नेत्यांचाही तीव्र विरोध आहे. शेतकरी संघटनेचे नेत राजू शेट्टी यांनीही राष्ट्रवादीला विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी-भाजप युतीच्या वृत्तामुळे नाराज झालेल्या शेट्टी यांनी राष्ट्रवादीला दूर ठेवण्याचा इशारा महायुतीच्या नेत्यांना दिला आहे. एकवेळ अपक्षांचे पाय धरू पण शरद पवारांचा हात नका धरू अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रसारमाध्यमे खोटी वृत्ते पसरवतात. प्रफुल पटेल यांनी मोदींना पाठिंबा देण्याविषयी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तशी शक्यताच नाही. काँग्रेसबरोबरच आम्ही राहणार आहोत.
 शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष