ज्येष्ठांचे आता आशीर्वाद घ्यायचे, निर्णय आपणच घ्यायचे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षात तरुण मंडळींचे महत्त्व वाढले पाहिजे, असे सूचित केले होते. पक्षानेही तरुण नेतेमंडळींवर सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपविली, पण राजकीय आघाडीवर तरुणांची फळी अपयशी ठरल्याने सारी सूत्रे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना स्वत:च्या हाती घ्यावी लागली.
राष्ट्रवादीने अजित पवार, जयंत पाटील, आर. आर. पाटील, राजेश टोपे, सुनील तटकरे, जयदत्त क्षीरसागर, सचिन अहिर आदी तरुण मंडळींना संधी दिली. प्रशासकीय पातळीवर छाप पाडली असली तरी राजकीयदृष्टय़ा सर्वच यशस्वी झालेले नाहीत. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीची सारी जबाबदारी पवार यांनी दुसऱ्या फळीतील नेत्यांवर सोपविली होती, पण तेव्हा पक्षाची पीछेहाट होऊन राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी पवार यांनी स्वत:कडे घेतली आणि पक्षाला चांगले यश मिळाले. आताही लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी निराशाजनक झाल्याने विधानसभा निवडणुकीच्या तयारीत पवार यांनी लक्ष घातले आहे.
तरुण मंडळींकडे कशी महत्त्वाची पदे सोपविली हे शरद पवार भाषणांमधून अभिमानाने सांगत. पक्षाने संधी दिलेल्या तरुण मंडळींनी स्वत:च्या पलीकडे काही बघितले नाही. त्य नंदुरबारमध्ये डॉ. विजयकुमार गावित यांनी एकहाती पक्ष वाढविला याकडेही लक्ष वेधण्यात येते.  तरुण नेतेमंडळींच्या एकूणच राजकीय कामगिरीबद्दल पक्षाध्यक्ष शरद पवार हे फारसे समाधानी नाहीत. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद आल्यापासून त्यांनी स्वत:ची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला. सिंचन घोटाळ्यांच्या आरोपांपासून अजितदादांचा आलेख खाली घसरला तो परत वर गेलाच नाही.
मुक्त वाव कोठे?
तरुण नेतेमंडळी राजकीयदृष्टय़ा अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात येत असला तरी पक्षात मुक्त वाव कोठे देण्यात आला, असा या मंत्र्यांचा युक्तिवाद आहे. अजित पवार यांचे पक्षात महत्त्व वाढले तसे अन्य तरुण मंडळींचे पंख कापण्यात आल्याची दुसऱ्या फळीतील नेत्यांची तक्रार आहे. आमच्या खात्यांमध्ये अजितदादांचा हस्तक्षेप वाढला असताना ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणली, पण त्याची दखलच घेतली गेली नाही, असे एका मंत्र्याचे म्हणणे होते.