काँग्रेस आणि नक्षलवाद्यांच्या संदर्भात ‘लोकसत्ता’त आज प्रकाशित झालेल्या वृत्ताचा उल्लेख करून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी येथील जाहीरसभेत काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. व्होट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेस सामान्य नागरिक व पोलिसांना ठार मारणाऱ्या नक्षलवाद्यांशी हातमिळवणी कशी करू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा खेळ अतिशय धोकादायक असून अशी हातमिळवणी होत राहिली तर नक्षलवाद्यांविरुद्ध कसे लढायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
येथील चांदा क्लबच्या मैदानावर शुक्रवारी सकाळी झालेल्या प्रचार सभेत मोदींनी भाषणाचा प्रारंभच लोकसत्तात प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेऊन केला. नक्षलवादाच्या मुद्यावर केंद्रातील युपीए सरकारमध्ये आरंभापासून गंभीर मतभेद आहेत, त्याचे दर्शन वारंवार देशाला घडत आहे. देशातीलच काही तरुण शस्त्रे हाती घेऊन या चळवळीत सक्रीय होत आदिवासींना ठार करत आहेत. या तरुणांची, आदिवासींची आणि सुरक्षा दलाची चिंता केंद्रातील काँग्रेसप्रणीत युपीए सरकारला नाही, अशी टीका मोदी यांनी या वेळी केली. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांनासुद्धा शस्त्रे खाली ठेवून हातात लेखणी घेण्याचे आवाहन केले. हा देश प्रगतीने हिरवागार करायचा आहे की, रक्त सांडवून रक्तरंजित करायचा, हे नक्षलवाद्यांनी एकदा ठरवून घ्यावे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ताने आज उघडकीस आणलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस देशविघातक शक्तीशी हातमिळवणी करू शकते व सत्तेसाठी राजकीय संस्कृतीसुद्धा खुंटीला बांधून ठेवू शकते, हेच यातून दिसून येते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा देण्यात यावी.
देवेंद्र फडणवीस

नक्षलवाद्यांनी ठार मारलेल्या शेकडो आदिवासींचा, तसेच शहीद पोलिसांचा अपमान करण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालवला आहे. सत्तेसाठी हा पक्ष कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो, हे यातून सिद्ध झाले आहे.
सुधीर मुनगंटीवार

‘काँग्रेसने खुलासा करावा’
नक्षलवाद्यांबरोबरच्या संबंधांबाबत काँग्रेसने, विशेषत: सोनिया गांधी यांनी खुलासा करायला हवा, अशी मागणी  प्रदेश भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शुक्रवारी केली. लोकसभा निवडणुकीत नक्षलवाद्यांबरोबर छुपे संधान बांधण्याच्या काँग्रेसच्या कारस्थानाचा शुक्रवारी ‘लोकसत्ता’ने गौप्यस्फोट केला. भाजपने तातडीने पत्रकार परिषद घेऊन त्याचा निषेध केला. त्याचबरोबर या गौप्यस्फोटाने काँग्रेसचा विघटनवादी चेहराही लोकांसमोर आणला आहे, अशी टीका भंडारी यांनी केली.