कामगारमंत्री भास्कर जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत माझे राजकीय नुकसान केले. त्याची परतफेड करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचीही तयारी आहे, अशी खळबळजनक घोषणा नारायण राणे यांचे पुत्र व काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी शनिवारी गुहागर येथे केली. राणे यांनी केलेले बंड नुकतेच शमले असताना आता नीलेश यांच्या भूमिकेमुळे ते पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
भास्कर जाधव.. राणे आणि स्वपक्षीय दोघांचेही लक्ष्य!
गुहागर येथे बोलताना नीलेश राणे यांनी जाधव यांच्यावर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले की, जाधवांनी लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात षडयंत्र रचून माझा पराभव केला. सावंतवाडीचे माजी आमदार दीपक केसरकर यांना बळ देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात माझ्याविरोधात वातावरण तापवले. त्यामुळेच माझा पराभव झाला. माझे राजकीय खच्चीकरण करण्याचे त्यांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले. त्यांना पैशाचीही मस्ती चढली आहे. म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, नारायण राणे यांच्याशी याबाबत चर्चा झाली का, असे विचारले असता तशी काही चर्चा झालेली नाही. मात्र, त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे नीलेश यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, नीलेश यांचे वक्तव्य आपण ऐकले नसल्याचे सांगून त्यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.