‘एनडीए’च्या मतांची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने राज ठाकरे यांना भेटलो होतो. त्यात गैर काय, असा उलट सवाल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी येथे केला.
नितीन गडकरी यांनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेतल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला असून शिवसेनेचे नेते यामुळे संतप्त झाले आहेत. गडकरी यांनी राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. दै. ‘सामना’मधून गडकरींच्या या कृतीबद्दल टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत.  
नागपुरात गुरुवारी एका कार्यक्रमात पत्रकारांनी गडकरी यांना गाठले. राज यांच्या भेटीनंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष वेधले असता गडकरींनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन टळले तर त्याचा फायदा ‘एनडीए’ व त्यातील इतर घटक पक्षांना होईल, हे वास्तव आहे. त्यामुळे काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन टाळण्याच्या उद्देशाने राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांना भेटण्यात गैर काय, असा सवाल गडकरी यांनी केला.