भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने हल्ला करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेत्यांनी चौफैर हल्ला चढविण्यास सुरुवात केली आहे. पवारांना पराभव समोर दिसू लागल्यामुळेच त्यांचा तोल गेला असून ते बेताल वक्तव्ये करत असल्याची टीका भाजपनेते नितीन गडकरी यांनी केली तर जनताच आता पवारांना घरी बसविण्याचा उपचार करेल, अशी खोचक प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काँग्रेसमुक्त भारत, असा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून सत्ता मिळाल्यानंतर त्यांच्यावर आम्ही उपचार करू, अशी टीका शरद पवार यांनी केली होती. बोटाची शाई पुसून दुसऱ्यांदा मतदान करा, या पवारांच्या विधानासह आजपर्यंतच्या त्यांच्या सर्व राजकीय कोलंटउडय़ांवरून एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यासह गडकरी व फडणवीस या भाजप नेत्यांनी शरद पवार यांच्यावर टिकेचा भडीमार केला आहे.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याची मागणी महात्मा गांधी यांनीच केली होती. काँग्रेसमुक्त देश हे गांधीजींचे स्वप्न सत्यात आणण्याचे काम मोदी करत आहेत असे खडसे म्हणाले. चौदा वर्षांपूर्वी सोनियामुक्त काँग्रेसची घोषणा पवार यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्यच चरणी लीन होण्याचे काम त्यांनी केले. पवार यांच्या भूमिका पहाता उपचार करण्याची गरज त्यांनाच अधिक आहे. राज्यात राष्ट्रवादीला चार-पाच जागाही मिळणार नाहीत हे जाणवल्यामुळे ते अस्वस्थ झाले व मोदींवर टीका करू लागले,असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पराभव समोर दिसत असल्यामुळे पवारांचा तोल ढळल्याचे सांगत त्यांच्या टीकेकडे फारस लक्ष न देणेच चांगले, अशी टिप्पणी गडकरी यांनी केली.