केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ई-रिक्षा कायदेशीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यातून कुटुंबाशी संबंधित कंपनीला फायदा होऊ शकतो, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले होते. मात्र ई-रिक्षाच्या उत्पादनाशी निगडित कंपनीशी गडकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण भाजप आणि सरकारकडून देण्यात आले आहे.
ई-रिक्षा उत्पादन उद्योगाशी गडकरी यांचे कोणत्याही प्रकारे संबंध नाहीत किंवा पूर्ती ग्रीन टेक्नॉलॉजीस्शी (पीजीटी) त्यांचा काहीही संबंध नाही, असे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. काही माध्यमांमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षांच्या उत्पादनाशी संबंधित काही हितसंबंध असल्याचे वृत्त होते. आम्ही या क्षेत्रात खूप छोटे आहोत. अनेक मोठे उत्पादक ई-रिक्षा उत्पादन करतात. आम्ही या उद्योगात चार वर्षे आहोत असे पीजीटीचे संचालक आणि गडकरींचे मेहुणे राजेश तोताडे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना स्पष्ट केले. एखाद्या व्यक्तीला जर काही व्यवसाय करायचा असेल तर तो राजकारण्याचा नातेवाईक आहे म्हणून घटनेने प्रतिबंध केला आहे काय, असा सवाल तोताडे यांनी केला. तर आम्ही काय करावे आणि काय करू नये हे माध्यमेच कसे ठरवतात, असा सवालही त्यांनी केला.
मोटार अधिनियम कायदा (१९८८) मध्ये सुधारणा करण्याची जी घोषणा केली त्याचा आणि पीजीटीचा संबंध हे व्यावसायिक हितसंबंधांचा भाग नाही का, असा प्रश्न मंगळवारी इंडियन एक्स्प्रसने गडकरींना विचारला होता त्याला त्यांनी बगल दिली होती. सध्याच्या कायद्यानुसार ताशी २५ किलोमीटर तसेच २५० व्ॉटखालील वाहन यातून वगळण्यात आले आहे. ई-रिक्षाला ६५० व्ॉटपर्यंत मोटार व्ॉटेज आहे. कायद्यात सुधारणा होण्याची आम्ही वाट पाहत आहोत, असे तोताडे यांनी सांगितले. गडकरी यांनी याबाबत दिल्लीतील १७ जूनच्या सभेत आश्वासन दिले होते. तर मग ई-रिक्षाचे उत्पादन आणि विपणन त्यांना शक्य आहे. पीजीटीशी संबंधित कोणताही संदर्भ गडकरींनी टाळला आहे. त्या ऐवजी कोणत्याही एका उद्योजकाची यावर मक्तेदारी नाही, असे गडकरींनी स्पष्ट केले होते. पीजीटीची नोंदणी २८ जानेवारी २०११ रोजी झाली असून, विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेकडून ई-रिक्षा उत्पादनचा परवाना त्यांना मिळाला आहे.
गडकरी हे पूर्ती शुगर आणि पॉवर लिमिटेडचे संचालक होते. नंतर ते संस्थेतून बाहेर पडले. गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आमच्या कंपनीत कोणतेही व्यावसायिक हितसंबंध नाहीत, असे तोताडे यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
तोताडे यांचे मोठे भाऊ किशोर कमलाकर तोताडे तसेच गडकरींची पत्नी कांचन या सॉफ्टलिंक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडवर संचालक आहेत. तर पीजीटीचे दुसरे संचालक प्रसाद प्रभाकरराव काशीकर हे चैतन्य कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर संचालक आहेत. यामध्ये गडकरींचा मुलगा सारंग संचालक आहे. विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेचा परवाना असला तरी उत्पादनाचा परवाना असल्याने पीजीटी बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षांचे विपणन करू शकत नाही.