केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखाली स्थापन होत असलेल्या सरकारला कधी गरज पडली तर आम्ही जरूर सल्ला देऊ पण कोणत्याही प्रकारे आम्ही सरकारवर अंकुश ठेवणार नाही की पक्ष आणि सरकारच्या कारभारात हस्तक्षेपही करणार नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रविवारी स्पष्ट केले.
भाजपच्या अनेक नेत्यांनी दिल्लीतील संघ कार्यालयात भेटीगाठींसाठी रीघ लावली असताना भाजपनेही मोदी सरकारच्या स्थापनेत संघाची कोणतीही भूमिका नसल्याचे रविवारी स्पष्ट केले. संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी जयपूर येथे सांगितले की, लोकसभा निवडणुकीतील दमदार विजयानंतर भाजपला किंवा मोदी यांना संघाने कोणतेही मार्गदर्शन केलेले नाही. राजकारण किंवा सरकारच्या कामकाजात संघ कधीही रिमोट कंट्रोल म्हणून काम करीत नाही आणि करू इच्छित नाही. राजकारण किंवा सरकारमध्ये हस्तक्षेप करण्याचे संघाला काहीच कारण नाही. त्यांना गरज वाटली तर ते सल्ला विचारू शकतात, असे माधव यांनी सांगितले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सुषमा स्वराज यांच्यात नाराजी असल्याबाबत विचारता माधव म्हणाले की, केवळ प्रसिद्धी माध्यमांनाच ती नाराजी दिसली आहे.