News Flash

उत्तर मुंबईच्या गोपाळ शेट्टींचा विक्रम

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यातही बोरिवली विधानसभा क्षेत्रात ‘मैदान-उद्यान सम्राट’ अशी ख्याती असलेले भाजपचे गोपाळ शेट्टी हे केवळ मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी विजयी

| May 19, 2014 03:59 am

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यातही बोरिवली विधानसभा क्षेत्रात ‘मैदान-उद्यान सम्राट’ अशी ख्याती असलेले भाजपचे गोपाळ शेट्टी हे केवळ मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. तब्बल चार लाख ५६ हजार मतांनी मिळालेल्या या विजयाचे स्वागत सेना-भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडूनही करण्यात आले असून नगरसेवक ते खासदार या वाटचालीत बोरिवली मतदारसंघात केलेली विकासाची कामे आणि मोकळ्या जागांचे संरक्षण करताना उभारलेली मैदाने व उद्याने यांना मिळालेली ही जनतेची पोचपावती आहे, असे खुद्द शेट्टी यांचेच म्हणणे आहे.
महापालिकेच्या १९९१ साली झालेल्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाल्यापासून आजपर्यंतच्या सर्व निवडणुकात विजयाची परंपरा राखताना प्रत्येक वेळी अधिकाधिक मताधिक्य मिळविण्यात गोपाळ शेट्टी यशस्वी झाले आहेत. जवळपास वर्षांचे सर्वच्या सर्व दिवस सकाळी साडेआठच्या ठोक्याला आपल्या कार्यालयात येऊन लोकांच्या समस्या जाणून घेणारा नगरसेवक ते आमदार या प्रवासात मतदारासंघातील मोकळ्या जागांवर अनधिकृत झोपडपट्टय़ा उभ्या राहणार नाहीत याची जास्तीत जास्त काळजी त्यांनी घेतली. यातूनच पालिकेच्या अथवा राज्य शासनाच्या मोकळ्या जागा तसेच मैदाने व उद्यानासाठी आरक्षित असलेल्या प्रत्येक जागेवर त्यांनी मैदान व उद्यानाची उभारणी केली. पोयसर जिमखाना ते राणी लक्ष्मीबाई उद्यानापर्यंत अनेक चांगली उद्याने व मैदाने विकसित करताना सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग कसा होईल, हे पाहिल्यामुळे बोरिवलीकर जनतेने त्यांना ‘उद्यान सम्राट’ अशी पदवी दिली. आमदार म्हणून अनेक समाज मंदिरे उभारतानाच महिला आधार भवन, ज्येष्ठ नागरिकोंसाठी ज्येष्ठालय उभारणी केली. ज्येष्ठालयाला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारही मिळाला होता. नगरसेवक ते आमदार म्हणून मि़ळणाऱ्या प्रत्येक निधीचा त्यांनी पुरेपूर वापर केला. परिणामी केवळ सर्वाधिक मतांनी शेट्टी निवडून आले. त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात सर्वाधिक मतदानही झाले.
दरम्यान, मतदान यंत्रांमध्ये गोलमाल केल्यामुळे आपला पराभव झाला असा आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार संजय निरुपम यांनी केला आहे. तर ज्यांना मतदान यंत्र सांभाळता येत नाही ते देश काय सांभाळणार असा सवाल करत, लोकांनी निरुपम यांना घरचा दाखवलेला रस्ता योग्यच असल्याची परखड प्रतिक्रिया गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 3:59 am

Web Title: north mumbai bjp mp gopal shetty top vote gain in maharashtra
Next Stories
1 राज्यात सेनाच भाजपचा मोठा भाऊ!
2 मनसेची मते युतीच्या पारडय़ात
3 काँग्रेस पक्षबांधणीत झोकून देण्याची शिंदे यांची तयारी
Just Now!
X