लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवासाठी केवळ महागाई जबाबदार नाही. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरले. कारण  सर्वच घटकांवर सरकारचे नियंत्रण नसते. विद्यमान सरकारलादेखील लवकरच याची प्रचिती येईल, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी महागाईच्या मुद्यावर केंद्र सरकारची पाठराखण केली.  
ते म्हणाले की, वाढत्या महागाईच्या मुद्यावर काँग्रेस सरकार गंभीर होते. परंतु प्रत्येक गोष्टीवर तुमचे नियंत्रण नसते.  सत्ता स्थापनेस अवघा एक महिनाही पूर्ण झालेला नसताना केंद्र सरकारने रेल्वे भाडय़ात वाढ केली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू महाग होण्याची चिन्हे आहेत. महागाईच्या मुद्यावर चिदंबरम यांना छेडले असता ते म्हणाले, महागाईमुळे काँग्रेसचा परावभ झाला, ही निव्वळ तार्किक मीमांसा आहे. प्रत्यक्षात त्यामागे अनेक कारणे आहेत. इराकमध्ये सुरु असलेल्या अराजक परिस्थितीचा संदर्भ देत ते म्हणाले, इराकमध्ये सुरु असलेल्या घडामोडींचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर होईल.त्याचा थेट फटका पेट्रोलिअम पदार्थाच्या दरांना बसतो. मागील सरकारलादेखील त्याचे परिणाम भोगावे लागले होते.  केंद्र सरकार केंद्रीय नियोज आयोग बंद करणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासंबंधी बोलताना चिदंबरम म्हणाले,  केंद्रीय नियोजन आयोगाचे अधिकार मर्यादीत असायला हवे. सद्यस्थितीत आयोगाचे स्वरूप अत्यंत मोठे व विनाकारण पसरट आहे. केंद्रीय नियोजन आयोगाचे अधिकार कमी करण्यावर वा आयोग गुंडाळण्याच्या चर्चाना दिल्लीत ऊत आला आहे. आयोग गुंडाळण्याचे समर्थन करीत असताना, हे आपले वैयक्तीक मत असल्याचे स्पष्टीकरण चिदंबरम यांनी दिले. राज्यपालांना हटविण्याचा आग्रह धरणाऱ्या सरकारला चिदंबरम यांनी सबुरीचा सल्ला दिला.