मतदान राजकीय पक्षाच्या अथवा अपक्ष उमेदवाराला करावे, याबाबत प्रत्येकाचा विचार आणि निकष वेगवेगळे असू शकतात. ते तसे असायलाही हरकत नाही. लोकशाहीत तर मतदान हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे चांगले राज्यकर्ते/ लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी आणि विद्यमान व्यवस्थेत बदल होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान केलेच पाहिजे. लोकशाहीच्या दृष्टीने मतदान न करणारी मंडळी गुन्हेगार आहेत.
आपण मतदान केले नाही तर काय फरक पडतो, मतदान करून आहे त्या परिस्थितीत काही बदल होणार आहे का, असे काही जणांना वाटते. पण आपल्याला बदल हवा असेल आणि चांगले राज्यकर्ते हवे असतील तर प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य बजाविले पाहिजे. योग्य राज्यकर्ते निवडण्याची संधी मतदानाच्या माध्यमातून असताना प्रत्यक्ष मतदान करायचे नाही आणि नंतर मात्र अमुक असे झाले पाहिजे, संपूर्ण व्यवस्था बदलली पाहिजे, चांगली माणसे राजकारणात नाहीत, अशी चर्चा करण्याला काही अर्थ नाही. मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केलेली असते. अनेक जण मतदान न करता त्या दिवशी मौजमजा करतात, सहलीला जातात हे योग्य नाही.
कोणीही मोठय़ा नेत्याने भ्रष्टाचार केला तर त्यांना शिक्षा होते, तुरुंगात जावे लागते, असे चित्र गेल्या काही वर्षांत पाहायला मिळत आहे. तरुण वर्गासाठी ती समाधानाची बाब आहे. आपण मत देऊन काय उपयोग? असे जे त्यांना वाटायचे, त्यात बदल झाला आहे. सुशिक्षित तरुणाईला मतदानाचे महत्त्व पटले आहे. तो जागरूक झाला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तरुणाई मोठय़ा प्रमाणात मतदान करेल, असे वाटते. मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय सुशिक्षित व सुजाण समाज मतदानाला घराबाहेर पडत नाही. हा वर्गही मोठय़ा प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडला तर चित्र नक्कीच बदललेले दिसेल.