भाजपने ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना येत्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिलेल्या अमृतसर मतदारसंघातून लढण्यास उत्सुक नसल्याचे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ़ अमरिंदर सिंग यांनी गुरुवारी स्पष्ट केल़े  जेटली यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसकडून अमरिंदर यांची अमृतसरमधून योजना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती़  या पाश्र्वभूमीवर अमरिंदर यांनी हे स्पष्टीकरण दिले आह़े
काँग्रेसकडे सक्षम आणि प्रभावी स्थानिक नेते आहेत, जे सहजरीत्या जेटली यांना धूळ चारू शकतात़  अमृतसर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि येथून काँग्रेसचे उमेदवार अनेक वेळा विजयी झाले आहेत़  मी अमृतसरबाहेरचा आह़े  त्यामुळे आवश्यक वेळ देऊ शकणार नाही, असे अमरिंदर यांनी त्यांच्या पत्रकात म्हटले आह़े   तीन आठवडय़ांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांना बटिंडा की अमृतसरमधून लोकसभा लढणार, अशी विचारणा सोनियांनी केली होती़  परंतु पत्नी परनीत कौर पटियालामधून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत़  त्यामुळे आपण लढू इच्छित नसल्याचे ते म्हणाले.