अभियांत्रिकीच्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या शिक्षण सम्राटांच्या महाविद्यालयांना दणका देण्यासाठी तसेच नियम धाब्यावर बसवून चालणाऱ्या महाविद्यालयांना अप्रत्यक्ष ‘संरक्षण’ देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उतरणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) सध्या राज्यातील २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या त्रुटींचा आढावा घेत आहे. हे काम ३ जुलैपर्यंत पूर्ण होऊन त्यांचे अहवाल कारवाईसाठी राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. प्रत्यक्षात असे अहवाल पाठवताना एआयसीटीईने सर्वोच्च न्यायालयात तसेच संबंधित राज्यातील न्यायालयातही कॅव्हेट दाखल करणे आवश्यक असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात एआयसीटीई तसेच डीटीईकडून कॅव्हेट दाखल केले जात नसल्यामुळे ‘सिटिझन फोरम’ने थेट अण्णा हजारे यांच्याकडे संपर्क साधला असून अण्णा हजारे आता अभियांत्रिकीच्या लढाईत सहभागी होतील, असे फोरमच्या सूत्रांनी सांगितले.  एआयसीटीईच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार ३ जुलैपर्यंत तक्रारी असलेल्या २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांची चौकशी पूर्ण झालेली असेल. यातील बहुतेक महाविद्यालयांत अपुरी जागा, एकाच जागेत अनेक अभ्यासक्रम चालवणे, शिक्षक नसणे तसेच अन्य आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता नसणे असे गंभीर आक्षेप असून या महाविद्यालयांना ‘संरक्षण’ देणाऱ्या तंत्रशिक्षण सांचालनालय, मुंबई विद्यापीठ तसेच एआयसीटीईमधील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी अण्णा हजारे यांच्याकडून केली जाणार आहे.
तंत्रशिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी कॅव्हेट दाखल करण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात कॅव्हेट दाखल होणार होणार नाही तोपर्यंत महाजन यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे प्रा. समीर नानिवडेकर व वैभव नरवडे यांनी सांगितले.