निवडणूक आयोगाबद्दलच्या आपल्या नव्या वक्तव्याने भाजप नेते गिरीराज सिंह पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. यावेळी गिरीराज सिंह यांनी निवडणूक आयोगाच्या निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी समान स्वरुपाच्या तक्रारींसाठी निवडणूक आयोगाने आचार संहितेच्या उल्लंघनाबाबत वेगवेगळी भूमिका मांडली असल्याचे गिरीराज सिंह म्हणाले आहेत.
गिरीराज सिंह म्हणाले की, “मला सांगण्यास दु:ख होते की, देशातील वेगवेगळ्या ठिकाणांवरील राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांबद्दलच्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याच्या समान तक्रारींसाठी निवडणूक आयोग वेगवेगळी भूमिका मांडत आहे. यातून आयोगाचे दुटप्पीपणा निदर्शनास येत आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह दाखविल्याप्रकरणी नरेंद्र मोदींविरोधात आचार संहितेच्या नियमाचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली परंतु, अमेठीमध्ये मतदान केंद्रात जाऊन मतदारांना आकर्षित केल्याप्रकरणी राहुल गांधींना निर्दोष ठरविले. आता मतदान केंद्रात निवडणूक अधिकाऱयांच्या लॅपटॉपवर अखिलेश यादवांचे छायाचित्राप्रकरणी आयोग कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहीले आहे.” असेही ते म्हणाले. गिरीराज सिंहांच्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱयात सापडण्याची शक्यता आहे.
याआधी नरेंद्र मोदींवर टीका करणाऱयांना भारतात राहण्याचा अधिकार नाही त्यांनी पाकिस्तानात जावे असे वादग्रस्त वक्तव्यावरून गिरीराज सिंह यांना निवडणूक आयोगाने फटकारले होते.