अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदारसंख्या गेल्या पाच वर्षांत सुमारे एक लाखाने वाढली असून आज होणाऱ्या मतदानामध्ये हा मतदार निर्णायक होऊ शकतो. उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव खासदार निलेश या मतदारसंघातील दुसऱ्यांदा कौल मागत असून महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी त्यांची लढत आहे.
मागील निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे खासदार सुरेश प्रभू यांचा सुमारे ४६ हजार मतांनी पराभव केला होता. त्यावेळी एकूण मतदारसंख्या १२ लाख ५२ हजार २५५ होती. गेल्या पाच वर्षांत वेळोवळी झालेल्या मतदार नोंदणी मोहिमेमुळे यंदाच्या निवडणुकीपूर्वी ही संख्या १३ लाख ६३ हजार ९५७ झाली आहे. म्हणजेच १ लाख ११ हजार ७०२ मतदार नव्याने नोंदले गेले आहेत. त्यापैकी सुमारे ६० ते ७० टक्के मतदार १८ ते २५ वयोगटातील असून या वर्गाचा ‘नमो’कडे जास्त कल असल्याचे स्थानिक पातळीवरील मतदार प्रतिक्रिया कार्यक्रमांमध्ये दिसून आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांच्या गटाने राऊत यांच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राणेंपुढे तगडे आव्हान उभे राहिले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातून केसरकर यांना सुमारे ७४ हजार मते पडली होती, तर कणकवलीतून राष्ट्रवादीचे कुलदीप पेडणेकर यांनी २६ हजार मते घेतली होती. या मतांपैकी राऊत यांच्या बाजूने ५० टक्के मते केसरकर-पेडणेकर फिरवू शकले तरी राणे यांच्यापुढे मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तसेच त्यानंतर झालेल्या जिल्ह्य़ातील नगर परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये केसरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी राणेंच्या काँग्रेसविरूध्द एकूण सुमारे ४० हजार मतांची आघाडी घेतली होती.  
मागील लोकसभा निवडणुकीत चिपळूण विधानसभा मतदारसंघाने राणे यांना सुमारे साडेचार हजार मतांची, तर रत्नागिरी मतदारसंघाने चार हजार मतांची आघाडी दिली होती. त्यामुळे आता नवमतदारच लढतीस निर्णायकता देतील.