कांदा-बटाटय़ाचा जिवनावश्यक वस्तुंमध्ये समावेश करून केंद्र सरकारने निर्यातीवर र्निबध आणल्यामुळे कांदा भाव २०० ते ३०० रुपयांनी घसरले आहेत. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची मते मिळविल्यानंतर मोदी सरकार आता त्यांच्या विरोधी धोरणे राबवत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केला. जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी  गुरुवारी दुपारी लासलगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले. तत्पुर्वी झालेल्या शेतकरी मेळाव्यात जोशी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविला.
लासलगाव रेल्वे स्थानकावर दुपारी जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी मनमाड-इगतपुरी शटल रोखून धरली. २० मिनिटाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे मार्गावरून हटविले. आंदोलनापूर्वी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शेतकरी मेळावा झाला. कांद्याचे भाव घसरण्यास केंद्र सरकारची धोरणे कारणीभूत असल्याचा आरोप जोशी यांनी केला.