‘अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ वगळता आजवर या देशाचे नेतृत्व एक तर काँग्रेसने तरी केले आहे किंवा काँग्रेसप्रणीत आघाडय़ांनी तरी. मात्र या निकालांनी या समीकरणात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत न आलेल्या किंवा त्यांना विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना देशातील जनतेने थोबाडीत ठेवून दिली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. देशाच्या राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद या निकालात आहे.
देशाच्या इतिहासात प्रथमच सत्तासूत्रे स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीच्या हाती पडली आहेत. या पिढीच्या महत्त्वाकांक्षा, स्वप्ने आणि ध्येय यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्रथमच स्वातंत्र्योत्तर कालखंडात जन्मलेल्या व्यक्तीस मिळत आहे. म्हणूनच या निकालाचे महत्त्व अधिक आहे.
वाराणसी या शहराने मला प्रेम दिले. वाराणसीतील जिल्हा प्रशासनाने मला प्रचारासाठी सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. मात्र मला ३ लाख ७० हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी करीत त्या प्रशासनास तुम्ही मतदारांनी उत्तम धडा शिकवला आहे. आणि याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे.
देशभरात प्रचार केल्यानंतर मी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काशी येथे आलो. त्या वेळी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यापलीकडे मला फारसा वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे मला मते द्या असे आवाहन काशीतील मतदारांना करण्यासाठीदेखील मला पुरेसा वेळ मिळाला नव्हता. मात्र त्या वेळी आपल्यात ‘नि:शब्द बंध’ तयार झाले होते. तुमच्याशी एक अक्षरही संवाद न साधलेल्या माझ्यासारख्या उमेदवाराला तुम्ही भरघोस मताधिक्याने निवडून आणलेत आणि त्या नि:शब्द बंधांवर शिक्कामोर्तब केलेत.
आजपासून पाच वर्षांनी महात्मा गांधी यांची १५०वी जयंती आहे. स्वच्छ गंगा, स्वच्छ काशी आणि स्वच्छ भारत ही या महात्म्यास सर्वोत्तम आदरांजली ठरेल. कोणे एकेकाळी काशी हे भारताला आणि विश्वाला मार्गदर्शन करणारे शहर होते. काशीचा ‘राष्ट्रगुरू’ आणि ‘विश्वगुरू’ हा दर्जा पुन्हा एकदा या शहरास प्राप्त व्हावा यासाठी आता आपण प्रयत्न करू या, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी वाराणसीकरांशी संवाद साधला.
भाजपला संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर आपल्या वाराणसी या मतदारसंघात गंगापूजनासाठी नरेंद्र मोदी आले होते. पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह त्यांनी येथे काशीविश्वेश्वराची पूजाही केली.