लोकसभेत काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा मिळाल्या असल्या, तरी विधानसभेत आम्ही दुप्पट जागा मागत नाहीत. आम्ही निम्म्याच जागा मागतो आहोत. आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही अजून किती दिवस अडवून धरायचे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली. आपण जातीयवादी नसून सत्यवादी असल्याची मल्लिनाथी करतानाच पवार यांनी, गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला साधा धक्का लागला असताना त्यांचा मृत्यू कसा झाला, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळले पाहिजे, असे वक्तव्य या वेळी केले.
राष्ट्रवादीच्या लातूर जिल्हा शाखेतर्फे दयानंद सभागृहात आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत देशभर सुनामी लाट आल्यासारखी स्थिती होती. या लाटेत तमिळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांतील मतदारांनी चांगली भूमिका वठवली. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी मात्र लाटेवर स्वार होणे पसंत केले. मात्र, दोनच महिन्यांत देशातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.  त्यांनी या आश्वासनांना हरताळ फासला. शेतीमाल हमीभावात काही बदल झाला नाही. शेतकरीविरोधी धोरणे केंद्र सरकार राबवत आहे. शेतकऱ्यांच्या घरात अच्छे दिन येणार नाहीत याची काळजी घेत आहे. भाजप-शिवसेनेच्या मंडळींना निवडून येण्यासाठी बहुजन चेहरा लागतो. सत्तेवर आल्यावर मात्र वेगळीच मंडळी सत्तेची फळे चाखतात. बोलणाऱ्यांचे गहू विकतात, न बोलणाऱ्यांचे काहीही विकत नाही हे लक्षात घेऊन तटकरे यांनी काँग्रेसची मंडळी निवडणुकीपुरते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वापरून घेतात व नंतर खडय़ासारखे बाजूला सारतात याबद्दल नापसंती व्यक्त केली.