मिझोरम आणि मेघालय या दोन राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण तीन जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेत स्वत:चा पक्ष स्थापन करणाऱ्या पी ए संगमांना कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याची करामत करावी लागणार आहे. तर मिझोरमची एकमेव जागा टिकवण्याची कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे. स्वतंत्र बोरोलँडचा मुद्दा तसेच त्रिपुरातल्या ब्रू नागरिकांना पोस्टाद्वारे मतदान करण्यास दिलेली परवानगी, यामुळे दोन्ही राज्यांमधील  वातावरण चांगलेच तापले आहे.
मेघालयमध्ये लोकसभेचे शिलाँग आणि तुरा हे दोन मतदारसंघ आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असणाऱ्या या दोन्ही मतदारसंघात ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) अध्यक्ष तसेच राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढणारे पी ए संगमा हे येथील महत्त्वाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढलेल्या संगमा यांच्या कन्या आणि तुरा मतदारसंघातील विद्यमान खासदार आगाथा संगमा यांनी पुन्हा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्याजागी आता स्वत: पी ए संगमा आपल्या पक्षातर्फे निवडणुकीत उतरले आहेत. तुरा मतदारसंघात काँग्रेसचे डॅरल विल्यम चेरन मोमिन हे पी ए संगमा यांच्याविरोधात उभे ठाकले गेले आहे. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीपुढे संगमांची कसोटी लागणार आहे. मेघालयमधील विरोधी पक्ष संयुक्त लोकशाही पक्ष आणि गारो नॅशनल कौन्सिल या पक्षांनी पी ए संगमांविरोधात आपला उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने या वेळी आपला उमेदवार उभा न करता दोन्ही जागांसाठी काँग्रेसच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएसोबत जाण्याची घोषणाही संगमा यांनी केल्यामुळे भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीव्यतिरिक्त इतर पक्षांची मदतही त्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील शिलाँग या दुसऱ्या मतदारसंघासाठी काँग्रेसने विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री व्हिन्सेट एच पाला यांनाच िरगणात उतरवले आहे. मात्र पाला यांच्याविरोधात तब्बल सात उमेदवार उभे आहेत. मेघालयातील दोन्ही जागा पटकावून संगमा तसेच भाजपला दणका देण्याचा निर्धार आघाडीने केला आहे.
प्रमुख लढती
तुरी मतदारसंघात एनपीपीचे पी ए संगमा विरुद्ध काँग्रेसचे डॅरल मोमिन
लक्षवेधी मुद्दा
तेलंगण राज्याच्या निर्मितीनंतर देशातील अनेक भागांत स्वतंत्र राज्यांच्या मागणीला जोर पकडू लागला आहे. मेघालयमध्येही निवडणुकीच्या काळात स्वतंत्र बोरोलँडचा मुद्दा उफाळून आला आहे. त्यामुळे स्वतंत्र बोरोलँडच्या मुद्दय़ाबाबत निवडणुकीनंतर सकारात्मक विचार करण्याचे संकेत काँग्रेसतर्फे देण्यात आल्याचे बोलले जात आहे.