नरेंद्र मोदी आणि पी. चिदम्बरम यांच्यातील वाक्युद्ध संपण्याची चिन्हे नाहीत. मोदींनी चिदम्बरम यांचा उल्लेख फेरमतमोजणीमंत्री असा केल्यावर चिदम्बरम यांनी त्याला उत्तर दिले आहे. त्यांनी मोदींचा उल्लेख चकमकफेम मुख्यमंत्री, खोटारडे अशा शब्दांमध्ये केला.
मतदारांना घडाळ्यांचे वाटप करताना चिदम्बरम यांची जी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत, त्याची चौकशी निवडणूक आयोगाने करावी अशी मागणी मोदींनी जाहीर सभांमध्ये केली. चेन्नईत चिदम्बरम यांनी मोदींचा उल्लेख खोटारडा असा करीत शिवगंगा मतदारसंघात फेरमोजणी झाली नसल्याचा दावा केला आहे. मोदी सातत्याने माहीत असूनही खोटे बोलत असल्याचा आरोप चिदम्बरम यांनी केला. ते जर मला फेरमोजणीमंत्री म्हणणार असतील तर त्यांना आपण चकमकफेम मुख्यमंत्री म्हणू, असा इशारा दिला.
चिदम्बरम यांच्या शिवगंगा जिल्ह्य़ाशेजारील रामनाथपुरम येथील सभेत मोदींनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढल्याचा आरोप केला. शिवगंगामध्ये चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधी यांचा उल्लेख सभेत मोदींनी शहजादे असा केला. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या राहुलना गरिबी माहीत आहे काय, असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला.