निवडणूक प्रचारतील रोड शो, घरोघरी जाऊन पत्रके वाटणे, प्रचार सभा आदींच्या माध्यमातून लहान मुलांना राबविण्यास ‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा’ने बंदी घातली आहे. या संदर्भात आयोगाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून मुलांच्या निवडणुकीतील गैरवापरावर प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.
निवडणुकीच्या प्रचारात लहान मुलांचा मोठय़ा प्रमाणावर वापर करून घेतला जात असल्याचे प्रसारमाध्यमांमधील बातम्यांमधून दिसून येत आहे. केवळ राजकीय पक्षाच्या सभा, मिरवणुकीमध्येच नव्हे तर मोठय़ा नेत्यांच्या प्रचार कार्यक्रमांमध्येही लहान मुलांना सर्रास राबविले जात असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकाराची ‘राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा’ने स्वत:हून दखल घेत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.