भाजपचे ठाणे शहराध्यक्ष मिलिंद पाटणकर यांनी स्वत:च्या अधिकारात जाहीर केलेल्या कार्यकारिणीविरोधात स्वपक्षातील काही नगरसेवकांनी बंडाचे निशाण हाती घेतले होते. त्यामुळे ही कार्यकारिणी काहीशी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यातच भाजपच्या प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनीही या कार्यकारिणीस स्थगिती दिल्याने नाराज झालेल्या पाटणकर यांनी शुक्रवारी शहराध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र  फडणवीस यांच्याकडे दिला आहे. या प्रकारामुळे ठाणे भाजपमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीनंतर ठाणे भाजपतील नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती. असे असतानाच मध्यंतरी, ठाणे महापालिका परिवहन सभापतीपदाच्या निवडणुकीत दगा केल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी मिलिंद पाटणकर यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. त्या वेळी त्यांचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेण्यात आला होता.  दरम्यान, सहा महिन्यानंतर पाटणकर यांनी स्वत:च्या अधिकारात शहर कार्यकारिणी जाहीर केली. पण, त्यास पक्षातील काही नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांचा विरोध होता.