नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसविण्याची स्वप्न पाहणाऱ्या भाजपचे ओदिशामध्ये मात्र विशेष अस्तित्व दिसत नाही़  २००९ साली राज्यातून भाजपला एकही खासदार निवडून आणता आलेला नाही़  या वेळच्या निवडणुकींमध्येही भाजपकडून लक्षणीय कामगिरी होण्याची शक्यता दिसत नाही़  त्यामुळे येथील सामना बिजू जनता दल विरुद्ध काँग्रेस असाच असणार आह़े
लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रच होणाऱ्या निवडणुका हे या वेळी ओदिशामधील निवडणुकांचे वैशिष्टय़ आह़े  १० आणि १७ एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत़  राज्यात आदिवासी आणि भटक्या जमातींचे लोकसंख्या प्रमाण लक्षणीय आह़े  लोकसभेच्या एकूण २१ मतदारसंघांपैकी ४ मतदारसंघ अनुसूचित जमाती आणि ३ मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत़  परंतु, राजकारण्यांकडून वर्षांनुवष्रे होणाऱ्या दुर्लक्षाला कंटाळून येथील काही आदिवासी जमातींनी येत्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आह़े  त्यामुळे काही लाख मते वाया जाण्याची शक्यता आह़े  नुका दोरा, मुका दोरा, राणा, माली आणि दोरा या प्रमुख आदिवासी जमातींकडून प्रामुख्याने कोरापुत मतदारसंघात निवडणूक बहिष्काराचा निर्णय घेतला.
बिजू जनता दलचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची राज्यातील भ्रष्टाचारविरोधी आणि विकासपुरुष अशी प्रतिमा त्यांच्या पक्षाला विधानसभेबरोबरच लोकसभेतही चांगले यश मिळवून देईल, असा अंदाज आह़े  २००० साली मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी राज्यावरील आपली पकड सैल होऊ दिलेली नाही़  याच कारणामुळे नवोदित आपचाही ‘भ्रष्टाचारविरोधी’ अजेंडा येथे फारसा यशस्वी होईल असे नाही़   
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ओदिशाच्या किनारपट्टी थडकलेल्या फायलिन वादळाला राज्य शासनाने यशस्वीरीत्या दिलेली टक् कर हा मुद्दा पटनाईक यांच्याकडून प्रचारासाठी वापरण्यात येत आह़े  काँग्रेस-भाजपने या काळात केवळ नक्राश्रू ढाळल़े  परंतु, राज्य शासनाने तातडीने उचललेल्या पावलांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली, असा प्रचार करून बीजेडी राष्ट्रीय पक्षांकडे जनमत वळू न देण्याचा प्रयत्न करीत आह़े
सध्या पुढे येत असलेल्या निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांच्या निकालांनुसार, ओदिशातून बीजेडीचे १२ आणि काँग्रेसचे ९ खासदार येत्या निवडणुकीनंतर लोकसभेत जातील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े  भाजपला कदाचित एकही जागा मिळणार नाही आणि मिळालीच तरी त्या २ ते ४ पेक्षा अधिक असणार नाहीत, असाही अंदाज आह़े  

महत्त्वाच्या लढती
* जगतसिंघपूर मतदारसंघात ‘मामा-भाच्या’ची लढत पाहायला मिळणार आह़े  येथील सध्याचे खासदार बिभूप्रसाद तरेई यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली आहे आणि त्यांचे मामा कुलमणी समल हे याच मतदारसंघातून बीजेडीच्या तिकिटावर निवडणुकीच्या िरगणात आहेत़
* कालहंदी मतदारसंघात सर्वाधिक १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़  काँग्रेसचे भक्ता आणि भाजपचे प्रदीप्ता नायक यांना टक्कर देण्यासाठी येथील राजघराण्यातील सदस्य अरका केशरी देव यांना बीजेडीने उमेदवारी दिली आह़े  त्यामुळे येथील लढत तिरंगी ठरणार आह़े
* सुंदरगढमध्ये काँग्रेसचे हेमानंद यांची माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार जुअल ओराम यांच्याशी अटीतटीची लढत होणार आह़े  त्यातच बीजेडीने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हॉकीपटू आणि राज्यसभेचे खासदार दिलीप तिर्की यांनाही याच मतदारसंघातून उमेदवारी दिली आह़े
* ओडिआ चित्रपट अभिनेते आणि बऱ्हामपूरचे खासदार सिद्धांत महोपात्रा यांना बीजेडीकडून पुन्हा याच मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आह़े