देशाचे पंतप्रधानपद हे सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखाकडेच असावे, मात्र ही कालसापेक्ष बाब असून सद्य:स्थितीत तरी या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीकडे असाव्यात असे आपल्याला वाटते, असे मत मावळते केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. केंद्रातील सत्ताकेंद्र पंतप्रधानांऐवजी काँग्रेस पक्षाध्यक्षांकडे असल्याचा आरोप पंतप्रधानांचे प्रसारमाध्यम सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे. त्याविषयी विचारलेल्या प्रश्नास ते उत्तर देत होते. स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष या दोन्ही पदांवर वेगवेगळ्या व्यक्ती होत्या, मात्र त्या वेळी पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची असामान्य होती. आता कालसापेक्ष यात बदल व्हावयास हवा, असे मत चिदम्बरम यांनी व्यक्त केले.

तर त्यांनी वढेरांविरुद्ध तक्रार करावी..
वढेरा हे देशाचे नागरिक आहेत. जर त्यांच्या आर्थिक व्यवहारांविरुद्ध कोणाचे काही आक्षेप असतील तर त्यांनी वढेरांविरोधात संबंधित यंत्रणांकडे औपचारिक तक्रार करावी. सरकार आपणहून एखाद्या व्यक्तीच्या चौकशीचा आदेश का देईल, असा सवाल चिदम्बरम यांनी उपस्थित केला.