१६ व्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना होलिकोत्सवाने मात्र सर्वपक्षीय राजकारण्यांना ‘मतभेद विसरून जवळ’ आणले. रंगांच्या उधळणीत देशातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाल्याचे चित्र रंगपंचमीच्या दिवशी पाहायला मिळाले.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या निवासस्थानी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमवेत रंगपंचमी साजरी केली. नेत्यांवर रंगांची उधळण करीत आणि मिठाईचे वाटप करीत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग, पक्ष प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी पक्ष कार्यकर्त्यांसह होळी साजरी केली. सिंग यांच्या निवासस्थानी अनेक कार्यकर्ते जमले होते. आपल्या लाडक्या नेत्याला रंग लावण्याची संधी कोणी सोडली नाही. स्वत: राजनाथ मात्र नगारा वाजविण्यात ‘रंगून’ गेले होते.
रामविलास पासवान आणि त्यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या सणाच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही होलिकोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला.