लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय नेत्यांचे प्रचार तसेच त्यांच्यासंबंधीच्या बातम्यांचाच जोर दिसून येत आहे. या पाश्र्वभूमीवर वृत्तवाहिन्यांच्या ‘प्राइम टाइम’मध्ये आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे आघाडीवर राहिले आहेत. केजरीवाल यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पिछाडीवर टाकल्याचे एका अभ्यासाद्वारे आढळून आले आहे. सीएमएस मीडिया लॅपतर्फे आज तक, एबीपी न्यूज, झी न्यूज, एनडीटीव्ही, सीएनएन आयबीएन या पाच अग्रणी वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आलेल्या बातम्यांचा अभ्यास करण्यात आला. १ ते १५ मार्च या काळात या वृत्तवाहिन्यांवरील रात्री ८ ते १० दरम्यानच्या प्रसारित करण्यात आलेल्या कार्यक्रमांदरम्यान केजरीवाल यांना ४२९ मिनिटे (२८.१९ टक्के वेळ) मिळाली, तर नरेंद्र मोदींना ३५६ मिनिटे (२३.९८ टक्के वेळ), राहुल गांधी यांना ७२ मिनिटेच (४.७६ टक्के) तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ३३ मिनिटे (२.२० टक्के)मिळाली. राजकीय पक्षांच्या बाबतीत भाजपला ३६९ मिनिटे, ‘आप’ला ३४५ मिनिटे व काँग्रेसला १९३ मिनिटे मिळाली.

मोदी- जोशीप्रकरणी भाजपची सारवासारव
कानपूर/ अमेठी : ‘देशात नरेंद्र मोदी यांची लाट नाही,’ असे विधान जोशी यांनी केल्याबाबत प्रसिद्ध झालेली वृत्ते निराधार आणि दिशाभूल करणारी आहेत. पक्षामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असा खुलासा भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केला. मोदी हे पक्षातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत आणि म्हणूनच ते पक्षाचे ‘प्रतिनिधित्व’ करीत आहेत, अशी प्रशस्तीही राजनाथ यांनी जोडली.
‘देशात मोदी यांची लाट नाही’ असे वक्तव्य ज्येष्ठ भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी केल्याचे वृत्त सोमवारी पसरले होते. त्यामुळे पक्षातील बेदिली चव्हाटय़ावर आल्याचे आरोप प्रतिस्पध्र्याकडून केले जात होते. मात्र राजनाथ यांनी ते फेटाळून लावले.
काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या ‘कामगिरी’ने जनता हैराण झाली आहे. आणि सरकारविरोधी लोकभावनेचे प्रतिनिधित्व करणारे नरेंद्र मोदी हे नैसर्गिक नेतृत्व आहे, असे आपण म्हणालो होतो. मात्र त्याचा विपर्यास केला गेला आणि या वावडय़ा उठविल्या गेल्या. आणि यामुळे आपण दुखी आहोत, अशी खंत मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केली.

महिला आयोगावरच मुलायम उखडले
बिजनोर-संबळ (उत्तर प्रदेश) : बलात्कार करणाऱ्याना दिल्या जाणाऱ्या शिक्षेबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांना नोटीस पाठवल्याने राष्ट्रीय महिला आयोगावरच ते उखडले आहेत. आयोग आपला अपमान करीत असल्याचे मुलायमसिंहांचे म्हणणे आहे. बिजनोर येथील प्रचारसभेत त्यांनी महिला आयोगाबरोबरच निवडणूक आयोगावरही टीका केली. महिलांच्या प्रश्नांसाठी आपणच संघर्ष केल्याचा दाखलाही मुलायमसिंह यांनी दिला. गेल्या आठवडय़ात मुलायमसिंहांनी ‘लडके लडके है, गलती हो जाती है’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महिला आयोगाने याबाबत निवडणूक आयोगाकडे दखल घेण्याची मागणी केली होती. त्यावर मुलायमसिंह संतापले आहे.

संघाच्या तालावर भाजप नाचतो ;सोनियांची टीका
मोरादाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी संकुचित आणि जहाल असून समाजात फूट पाडणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे आणि भाजप त्यांच्या तालावर नाचत आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे केला. लोकसभेची ही निवडणूक  भिन्न  विचारसरणींमधील लढत असल्याचेही त्या म्हणाल्या. अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी काँग्रेसने स्वतंत्र मंत्रालय आणि राष्ट्रीय वक्फ विकास महामंडळाची स्थापना केली आणि तसे करताना अल्पसंख्य समाजातील महिलांचे सक्षमीकरण हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले, असे नमूद करून मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सोनियांनी केला. ज्या संघटनेची विचारधारा संकुचित आणि जहाल आहे त्यांच्या तालावर काही जण नाचत आहेत. त्यामुळे अनेक शतकांपासूनच्या रूढी-परंपरा यांचा नाश होत आहे, असेही त्या म्हणाल्या.

शैक्षणिक कर्जावरील व्याजमाफीस स्थगिती
नवी दिल्ली : नऊ लाख विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफ करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या २६०० कोटी रुपयांच्या योजनेची अंमलबजावणी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत करू नये, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्थमंत्रालयाला व्याजमाफीची योजना राबविता येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या कालावधीत योजनेची जाहिरात करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी अंतरिम अर्थसंकल्पात व्याजमाफीची घोषणा केली होती.